आंबेओहळच्या अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न,८ धरणग्रस्तांवर गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:16 PM2020-12-08T14:16:37+5:302020-12-08T14:21:23+5:30

Dam, Farmer, Crimenews, Police, kolhapur आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आठ धरणग्रस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्मक्लेश आंदोलन सुरू असताना उपविभागीय अभियंता दिनेश विठ्ठल खट्टे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केला.

Attempt to kill Ambeohal officer, crime registered against 8 dam victims | आंबेओहळच्या अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न,८ धरणग्रस्तांवर गुन्हा नोंद

आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे रॉकेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न करणारे धरणग्रस्त.

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा धरणग्रस्तांचा आरोपप्रांतकचेरीसमोर गुरूवारपासून आंदोलन करणार : श्रीपतराव शिंदे

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आठ धरणग्रस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्मक्लेश आंदोलन सुरू असताना उपविभागीय अभियंता दिनेश विठ्ठल खट्टे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केला.

अधिक माहिती अशी, आंबेओहळ धरणग्रस्तांचे आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी शिवाजी धोंडीबा गुरव, सचिन विष्णू पावले, गणपत केरबा पावले, दिनकर बाळू पावले, शामराव दशरथ पुंडपळ, कल्पक पावले, सुरेश रामचंद्र पावले, राजू गोविंद पावले (रा. आर्दाळ, ता. आजरा) हे धरणस्थळावर गेले होते.

काम बंद करा असे आवाहन धरणग्रस्त करत होते. काम बंद करीत नसल्याने धरणग्रस्त रॉकेल घेवून स्वत: आत्मदहन करण्यासाठी अंगावर ओतून घेवून पेटवून घेत होते. यावेळी शिवाजी गुरव यांनी रॉकेलचे कॅन व काड्याची पेटी काढून घेतली.

यावेळी उपअभियंता खट्टे होते. यावेळी रॉकेलचे फवारे खट्टे यांचे अंगावर गेले असे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे.
दरम्यान खट्टे यांनी आजरा पोलिसात दिलेल्या वर्दीवरून सचिन पावले, शिवाजी गुरव, गणपत पावले, दिनकर पावले, शामराव पुंडपळ, कल्पक पावले, सुरेश पावले, राजू पावले यांनी संगनमताने प्रकल्पस्थळी येवून कट रचून अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला.

दरम्यान, चार वाजता पाटबंधारे विभागाने आठ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच धरणग्रस्त आक्रमक झाले. या घटनेची माहिती मिळताच उत्तूर पोलिस दूरक्षेत्रास माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, पं. स. सदस्य बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे यांनी भेट दिली.

अ‍ॅड. शिंदे म्हणाले, २१ वर्ष धरणाचे काम बंद आहे, आणखी चार दिवस बंद झाले तर काय फरक पडणार आहे. आपण आंबेओहळ प्रकल्पाच्या पुर्नवसनाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बोललो असताना काम का सुरु केले. लोकांच्या भावनेचा विचार करावा. घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती वेगळी दाखवली आहे.

परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये. घडलेली घटना निंदनीय असून धरणग्रस्तांच्या चळवळीच्या सर्व संघटना अटकेचा निषेध व पुनर्वसनासाठी प्रांत कार्यालय, गडहिंग्लज येथे आंदोलन करणार आहेत.
यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, प्रकल्प अभियंता स्मिता माने, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसिलदार विकास अहिर, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे मंडल अधिकारी प्रशांत गुरव आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

पुनर्वसनाचा एक अधिकारी नाही

ज्या न्याय मागण्यांसाठी पुनर्वसनाचा अधिकारी आत्मक्लेश आंदोलन सुरु असताना फिरकलेच नाहीत. पांटबधाऱ्याचे अधिकारी यांना काम पूर्ण करण्याचा दबाव असल्याने त्यांनी काम सुरू केले. मात्र, पुनर्वसनाचा अधिकारी फिरकलाच नाही. पुनर्वसन पूर्ण झाले असते तर ही घटना घडली नसती.

 वीस वर्षानंतर अटक सत्र

२००१ मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याबद्ल ११३ धरणग्रस्तांना अटक करण्यात आली होती. २० वर्षानंतर ८ धरणग्रस्तांना सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचे धाडस केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला. शिवाजी गुरव यांना ताब्यात घेतले असून अन्य धरणग्रस्तांचा पोलिस शोध घेत आहेत.

काम नव्हे साफसफाई
घळभरणीचे शासनाचे उदिष्ट असल्याने धरणस्थळावर जागा साफसफाई सुरु होती. पाणीसाठा करावयाचा होता. त्यामुळे इतर कामे सुरु होती. धरणग्रस्तांना वाटले आम्ही काम सुरू केले. धरणग्रस्तांनी आमच्या कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
महेश सुर्वे,
मुख्य कार्यकारी अभियंता

चळवळीच्या संघटनांना आवाहन
धरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल केले असून न्याय मागण्यासाठी रखडलेले पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी चळवळीच्या संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात संख्येने सहभागी व्हावे.
अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे,
माजी आमदार.
 

Web Title: Attempt to kill Ambeohal officer, crime registered against 8 dam victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.