ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 01:12 PM2021-05-07T13:12:52+5:302021-05-07T13:34:44+5:30
CoronaVIrus Kolhapur : कर्नाटकातील बेल्लारी येथूून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा गुरुवारी रोखला. पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाशी बोलणी सुरू आहे. तोपर्यंत अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूरला ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूर : कर्नाटकातील बेल्लारी येथूून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा गुरुवारी रोखला. पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाशी बोलणी सुरू आहे. तोपर्यंत अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूरला ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला कर्नाटकातील बेल्लारी येथून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. आधीच जिल्ह्याला रोज अगदी काठावर ऑक्सिजन मिळत असताना गुरुवारी अचानकच कर्नाटक सरकारने हा पुरवठा थांबविल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून दर दोन दिवसांनी देशातील ऑक्सिजन स्थितीचा आढावा घेतला जातो. त्यात कर्नाटकने महाराष्ट्राला करण्यात येणारा ऑक्सिजनचा ५० टन साठा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारमधील मंत्री, अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे तसेच हा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्राशीदेखील बोलणी सुरू आहे. तोपर्यंत राज्यातील अन्य जिल्ह्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल याचे नियोजन केले जात आहे.
दहा टन पुरवठा थांबवावा..
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरातून गोव्याला दहा मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तो थांबवावा आणि बेल्लारीतून थेट गोव्याला ऑक्सिजन पाठवावा, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. या निर्णयाचा त्रास कोल्हापूरला होणार आहे; पण त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
जिल्हाधिकारी तळ ठोकून
कोरोना रुग्णांसाठी दिवसेंदिवस वाढत्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण व्हावी, पुरवठा करण्यात कोठेही घोळ केला जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई हे ऑक्सिजन निर्मिती होते त्या कोल्हापूर ऑक्सिजनसह निर्मिती प्लांटवर तळ ठोकून आहेत. रोज दिवसभरातील कामकाज आटोपले की त्यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार हे ऑक्सिजन प्लांटला भेट देतात.