जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुरुम टाकण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:38+5:302021-03-31T04:25:38+5:30
कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील गायरानात केल्या जात असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननावर महसूल अधिकारी कायदेशीर कारवाई करत ...
कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील गायरानात केल्या जात असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननावर महसूल अधिकारी कायदेशीर कारवाई करत नसल्याच्या विरोधात मंगळवारी रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर मुरुम टाकण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसांनी काढून घेतला.
यानंतर रघुनाथदादा यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले. शिये गावातील सर्व्हे नं. २५९ व २८३ मधील गायरानात काही लोक गौण खनिजाचे उत्खनन करुन अतिक्रमण करत आहेत. ही बाब तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांना वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी कायदेशीर कारवाई केली नाही. अधिकारी या लोकांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे, शासकीय भूखंड संपत असून गावातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे या लॅन्ड माफियांची चौकशी करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ॲड. माणिक शिंदे, उत्तम पाटील, बाबासाहेब गोसावी, के. बी. खुटाळे, धनाजी चौगुले, देविदास लाडगावकर, अभिजित चौगुले, युवराज राऊत, विनोद कुसाळे, डॉ. प्रगती चव्हाण उपस्थित होत्या.
--