कोल्हापुरात स्टेशन रोडवरून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेची सुटका
By उद्धव गोडसे | Published: October 11, 2023 06:25 PM2023-10-11T18:25:01+5:302023-10-11T18:33:37+5:30
दुचाकीला धडक देऊन संशयित पळाले
कोल्हापूर : स्टेशन रोडवर थांबलेल्या एका महिलेचे दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून आणि तोंडाला रुमाल लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर घडली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून जिल्हा न्यायालयासमोर कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धावत्या कारमधून उडी मारून महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली, तर पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन संशयित पळाले.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर स्टेशन रोडवरील एका बेकरीसमोर संबंधित महिला उभी होती. त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी महिलेच्या तोंडाला रुमाल लावून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर कार स्टेशन रोडवरून भवानी मंडपकडे गेली. तिथून पुन्हा कार छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी महिलेने वाचवा... वाचवा... असा आरडाओरडा केल्याने बंदोबस्तासाठी असलेले लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अभिजीत चव्हाण यांनी एका होमगार्डसह दुचाकीवरून कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांकडून पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच कार भरधाव वेगाने सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोल पंप, कलेक्टर ऑफिस ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालयाच्या दिशेने गेली.
पोलिसांनी कारचा पाठलाग करीतच याती माहिती कंट्रोल रूम आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याला दिली. धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकातून कार सेवा रुग्णालयाच्या दिशेने गेली. सेवा रुग्णालयापासून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने गेलेल्या कारच्या पुढे जाऊन पोलिसांनी धाडसाने कार अडवण्याचा प्रयत्न केला. कारची गती कमी होताच संबंधित महिलेने कारमधून बाहेर उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. त्याचवेळी पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन संशयित निघून गेले. महिलेच्या फिर्यादीनुसार अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, शाहूपुरी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.