दुंडगेत येथे विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न, संशयित तरूणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:15 PM2020-12-10T12:15:40+5:302020-12-10T12:18:38+5:30
Crimenews, Police, Kolhapurnews दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील नवीन वसाहतीमध्ये माहेरी राहणाऱ्या विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजूबाजूच्या तरूणांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांनी ताब्यात दिले.
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील नवीन वसाहतीमध्ये माहेरी राहणाऱ्या विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजूबाजूच्या तरूणांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांनी ताब्यात दिले.
सुनिल जंबू मादर (मूळगाव बेळवी, ता. हुक्केरी, सध्या रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, दुंडगे येथील पिडीत युवतीचे दोन वर्षापूर्वी विवाह झाला आहे. परंतु, कौटुंबिक कारणामुळे ती माहेरीच राहते.
मंगळवार (८) सकाळी सव्वाआठच्या सुमारास ती आपल्या घराच्या दारात उभी होती. त्यावेळी सुनिल याने तिला दादा घरात आहे का असे विचारत घरात ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यामुळे तिची चुलती व चुलत बहिण धावून आले. त्यामुळे सुनिलने तेथून पळ काढला.
शेतवडीतून तो गडहिंग्लजच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच परिसरातील तरूणांनी त्याचा पाठलाग करून नेवडेतळानजीक त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, संशयित तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पिडीतेच्या नातेवाईकांसह तरूणांनी पोलिस ठाण्यासमोर कांहीकाळ ठिय्या मांडला होता. माजी आमदार श्रीपतराव शिंदे व बाळेश नाईक यांनीही पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची भेट घेवून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.
संशयित आरोपी सुनिल याने दुंडगे येथे नवीन वसाहतीमध्ये वाहनांच्या पेटींगचा व्यवसाय सुरू केला आहे. आई-वडीलांसह तो आपल्या नातेवाईकांच्या घरी राहतो. यापूर्वी त्याने हुबळी येथेही असाच प्रकार केल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू होती.
दुंडगेतील तरूणांचे धाडस
पाठलाग करून पकडायला येणाऱ्या तरूणांवर दगडफेक करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही आरोपीने केला. परंतु, धाडसाने तरूणांनी त्याला पकडले.