Kolhapur: चॉकलेट देण्याचा बहाण्याने मुरगुडमध्ये शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 05:08 PM2024-08-07T17:08:16+5:302024-08-07T17:14:00+5:30
मुलींच्या धाडसाचे कौतुक
मुरगूड: मुरगूड शहरानजीकच्या शाहूनगर वसाहतीतून मळे पाणंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणंद मार्गाने शाळेकडे जात असलेल्या दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा अज्ञात दोघा व्यक्तींनी प्रयत्न केला. मुलींनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यानंतर अज्ञातांनी पळ काढला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थी व पालकांत भीती पसरली आहे. पोलिस अज्ञात व्यक्तींच्या शोधात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी मुरगूडपासून १ किलोमीटर अंतरावरील शाहूनगर वसाहतीमधून अल्पवयीन दोघी मुली मंगळवारी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास मुरगूड शहरातील एका शाळेला पाणंद रस्त्याने येत होत्या. दरम्यान, काळा ड्रेस व बुरखा परिधान केलेला एक इसम अचानक उसातून बाहेर आला व तो मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा करीत जवळ आला. त्याचवेळी त्याने आपल्या अन्य साथीदारांशी कन्नड भाषेतून मोबाइलवर संपर्क साधल्याक्षणी क्षणार्थात तेथे मारुती व्हॅन घेऊन दुसरा अज्ञात इसम आला.
या व्हॅनमध्ये एका मुलीला जबरदस्तीने कोंबण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्या मुलीने आरडाओरडा करीत पळ काढला. हर्षदानेही प्रसंगावधान राखत आरडाओरड केली. त्या इसमाला दगड मारत आपली सुटका करून घेण्यात ती यशस्वी झाली. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी तेथून मारुती व्हॅनमधून पळ काढला. घाबरलेल्या हर्षदा व सिद्धीका या दोघी शाळेत न जाता सरळ घराकडे गेल्या व त्यांनी घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.
या प्रकाराने मुरगूड परिसरात खळबळ उडाली. पालकांनी यासंबंधी पोलिसांत धाव घेतली व घडल्या प्रकाराची हकिकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाहीत. मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेने शाळकरी मुली व पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा व संबंधितांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे .