फेसबुक हॅक करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न, डाएटच्या प्राचार्यांची सतर्कता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 02:09 PM2020-07-04T14:09:21+5:302020-07-04T14:20:18+5:30
रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या जुन्या फेसबुक अकाऊंटवरुन हॅकरने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
रत्नागिरी : जुने फेसबुक खाते हॅक करून अनेकांना ह्यमाझे वडील आजारी आहेत. मी आयसीयूमध्ये आहे, मला तातडीने पन्नास हजार रुपये पाहिजेत, तीस हजार रुपये पाहिजेत, असा इंग्रजीमधून मेसेज पाठवून फसवणूक करू पाहणाऱ्या हॅकरचा हा खेळ वेळीच लक्षात आल्याने अनेकांची आर्थिक फसवणूक होताहोता टळली.
रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या जुन्या फेसबुक अकाऊंटवरुन हॅकरने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
हा सारा फसवणुकीचा प्रकार २९ जून रोजी सकाळी घडला. डॉ. गजानन पाटील यांचे जुने फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक करुन त्यावरून अनेकांना माझे वडील आजारी आहेत, मी आय. सी. यू.मध्ये आहे, मला तातडीने पन्नास हजार रुपये पाहिजेत, तीस हजार रुपये पाहिजेत, असा इंग्रजीमधला मेसेज पाठविला होता.
सुमारे तासाभरात अनेकांना हा मेसेज गेल्याने संबंधित लोकही हैराण झाले. यावेळी काहींनी बँकेचा खाते नंबर मागितला. त्यावर हॅकरने गुगल पेचा अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोड नंबरही दिला. काहींनी त्याला फोनवरून संपर्कही केला. त्यावेळी तो इंग्रजीमध्ये बोलत होता. त्यामुळे काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
मात्र, डॉ. पाटील यांच्या एका मित्राने त्यांना फोन लावला व सर काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही आय. सी. यु.मध्ये आहात का? वडिलांची तब्बेत कशी आहे? असे विचारले. मात्र, हे प्रश्न ऐकताच काहीतरी गडबड असल्याचे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता, त्यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केल्याचे समजले.
त्यामुळे त्यांनी तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक, सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. बँकेलाही पत्र देऊन खाते तात्पुरते बंद केले. फेसबुकचे जुने खाते डीअॅक्टिव्ह केले आणि चालू फेसबुकवरून सर्वांना सावध करणारा संदेश पाठवला. सोशल मीडियावरून लोकांना सावधानतेचे आवाहन केले. तसेच वास्तवाची सर्वांना कल्पना दिली. डॉ. पाटील यांनी फेसबुक कंपनीकडेही याविषयीची तक्रार नोंदविली आहे.
एक केंद्रप्रमुख हॅकरच्या या फसवणुकीला बळी पडले. त्यांनी तातडीने पैसे भरले होते. डॉ. पाटील यांचे काही स्नेही आणि आयटी सेलमधील काहींनी त्या फोनचा सुगावा लावला. यावेळी तो फोन नंबर ओडिसामधला असल्याचे समजले.
अकाऊंट डीअॅक्टिव्ह करूनही त्या तोतयाने ऑनलाईन मेसेंजरवरून परत संदेश पाठवायला सुरुवात केली होती. मात्र, डॉ. पाटील यांनी तातडीने केलेल्या तक्रारीमुळे आणि त्यांच्या आयटी सेलमधील तज्ज्ञांच्या कामगिरीमुळे फसवणुकीचा मोठा प्रकार रोखला गेला.
कोणीतरी माझ्या नावाने फेसबुकवर माझा फोटो वापरुन परिचित व्यक्ंितना किंवा मित्रांना फेसबुक मेसेंजरद्वारे संदेश पाठवून मी अडचणीत असल्याचे सांगून मोठी रक्कम मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत मी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्ट्राग्रामसारख्या कोणत्याही सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ऑनलाईन वैयक्तिक संवाद अथवा चॅटिंग/मेसेजेस् अजिबात करत नाही. तरीही मला हा अनुभव आला. सर्वांनी प्रसारमाध्यमांचा सावधपणे वापर करावा. अनोळखी व्यक्तीसोबत आॅनलाईन आर्थिक व्यवहार करु नये.
- डॉ. गजानन पाटील, प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी