गायरान अतिक्रमणप्रश्नी स्वत:ची चिता रचून आत्मदहनाचा प्रयत्न, कोल्हापुरातील पन्हाळा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 05:47 PM2022-11-25T17:47:10+5:302022-11-25T18:05:04+5:30
याप्रकारानंतर एकच खळबळ उडाली.
नितीन भगवान
पन्हाळा : गायरान अतिक्रमणप्रश्नी सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने एकाने पन्हाळा प्रांतकार्यालयासमोर जिवंतपणीच चिता रचून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पन्हाळा पोलिसांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकारानंतर एकच खळबळ उडाली.
गायरानातील अतिक्रमणधारकांचे गेले तीन दिवस पन्हाळा प्रांत कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडूनआंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने मुलकीपड संघटनेचे अध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे, पुजा कदम व अशोक गायकवाड यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान आज सरण रचून शंकर कांबळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण पन्हाळा पोलीसांनी हा प्रयत्न हाणून पडला.
याप्रकारानंतर प्रांत कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान आमदार डॉ. विनय कोरे यांनी घटनास्थळी येवुन शंकर कांबळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार कोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार विनय कौवलवकर, पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, कोडोली पोलिस निरीक्षक डोइजड, त्याचबरोबर अतिक्रमणधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.