मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, कोल्हापुरात घडली घटना
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 30, 2022 03:42 PM2022-08-30T15:42:53+5:302022-08-30T15:51:13+5:30
अनुकंपा अंतर्गत दाजीला नोकरी मिळत नाही म्हणून मेव्हण्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ही घटना घडली. याघटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. आत्मदहन करणाऱ्याच्या हातातून रॉकेलचा कॅन काढून घेतल्याने अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी, जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपा अंतर्गत दाजी परशराम कांबळे यांना नोकरी मिळत नाही म्हणून मेव्हणा संतोष कांबळे याने आज, मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच ही घटना घडली.
मंत्री चंद्रकांत पाटील हे कागल नगरपरिषद झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डसाठीच्या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. दुपारी दोन वाजता संतोष कांबळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. अन् त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक गजानन परीट व जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई राजू भालचिंम आणि दिलीप वडर यांनी प्रसंगावधान राखत संतोष कांबळे याला आत्मदहन करण्यापासून रोखत त्याच्याकडून रॉकेलचा कॅन काढून घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.