पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात एकाच आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 10:51 AM2021-03-07T10:51:55+5:302021-03-07T10:53:11+5:30
Crime News Kolhapur- मालमत्तेचा वाद व अवैधरित्या सुरू असलेल्या मद्यविक्रीची दखल न घेतल्याने गोकुळ शिरगाव येथील एकाने शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. भीमराव करवते (रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
कोल्हापूर : मालमत्तेचा वाद व अवैधरित्या सुरू असलेल्या मद्यविक्रीची दखल न घेतल्याने गोकुळ शिरगाव येथील एकाने शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. भीमराव करवते (रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
गोकुळ शिरगाव येथे भीमराव करवते हे कुटुंबीयासह राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाऊ बाबूराव करवते यांच्या मदतीने गोकुळ शिरगावमधील मालमत्ता खरेदी केली होती. तेथे बार सुरु केला होता. कालांतराने दोन्ही भावात वाद झाल्याने भीमराव यांना बाजूला करुन त्याचे भाऊ बाबूराव करवते यांनी सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. तेथे बेकायदेशीर मद्यविक्रीचा व्यवसाय सुरु केला.
याबाबत भीमराव करवते यांनी कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात अर्ज पाठवला होता. पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने संतप्त झालेले भीमराव करवते हे शनिवारी दुपारी मुलगा स्वप्नील सह पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. तेथे त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी ते स्वत:ला पेटवून आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असताना कार्यालयातील महिलांनी व मुलाने त्यांना आडवले. त्यानंतर पोलीस कॉ. सागर माने, उमेश कांबळे यांनी त्यांना ताब्यात घेऊन शाहुपूरी पोलीस ठाण्यात आणले. आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.