पोलिसांनी गुन्ह्यात अडकवल्याने युवकाचा रंकाळ्यात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 06:19 PM2020-09-12T18:19:40+5:302020-09-12T18:22:09+5:30
करवीर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने संतप्त युवकाने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर : करवीर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने संतप्त युवकाने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सुनील शांताराम बागम (वय ३८ रा. जयहिंद कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स समोर कळंबा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्यावर रात्री उशीरापर्यत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. थेट पोलीस अधिकाऱ्यांवर पैशाच्या मागणीचे आरोप केल्याने पोलीस खात्यात खळबळ माजली.
विशेष म्हणजे, जलसमाधी घेणार असल्याचा तक्रार अर्ज त्याने दोन दिवसापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून संध्यामठ ते रंकाळा टॉवर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त व अग्नीशमन दलाचे जवान तैनात होते. त्यांनाही चकवा देत त्याने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण अग्नीशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढून त्याला वाचवले. या प्रकारामुळे रंकाळा टॉवर परिसरात नागरीकांचीही गर्दी झाली होती.