चॉकलेट दाखवून जवळ बोलावले ; सलग दुसऱ्या दिवशीही लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 07:35 PM2020-02-08T19:35:39+5:302020-02-08T19:45:35+5:30
दरम्यान, सलग दोन दिवस सुरू असणाऱ्या या प्रकारामुळे पालक भीतीच्या छायेत आहेत.याबाबत ग्रामस्थांसह सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त होत आहे
दत्ता पाटील
म्हाकवे (कोल्हापूर) :
नानीबाई चिखली (ता.कागल) येथे सलग दुसऱ्या दिवशीही लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, मुलांसह ग्रामस्थांच्या प्रसंगावधानतेमुळे चोरटयांचे प्रयत्न अयशस्वी झाले. परंतु, यामुळे चिखली परिसरात भितीचे वातावरण पसरले असून याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन सोशल मीडियावरून होत आहे.
याबाबत माहिती अशी, शुक्रवारी दुपारी ३वा. रुद्र सचिन परमणे (वय ७) या मुलाला ओमनी गाडीतून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तरुणांनी चाँकलेट दाखवून जवळ बोलावले. तो मुलगा त्या गाडीजवळ गेला मात्र,तोंडाला बांधलेला रुमाल पाहून तेथून पाठीमागे पळू लागला.यावेळी पळताना रुद्र दगडाला टेचकाळून खाली पडला.आणि जोर जोरात रडू लागला. यावेळी दुकानातील महिला बाहेर आल्या. ते पाहून त्या तरुणांनी काढता पाय घेत कोडणीमार्गे निपाणीकडे पळ काढला. ही गाडी गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.
तर, शनिवारी दुपारी तीन वाजता तुकान गल्लीत खेळत असणाऱ्या मुलांना छोटा हत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहनांतून आलेल्या तरुणांनी या मुलांना जवळ बोलाविले मात्र,अनोळखी व्यक्तीने बोलावले तर जवळ जायचे नाही. अशा सुचना शाळेत शिक्षकांनी दिल्या होत्या. त्यामुळे ही मुले आप आपल्या घरी पळून गेली. यावेळी काही महिला बाहेर आल्यानंतर त्यांनी पळ काढला. या महिलांना गाडीचा नंबर घेता आला नाही.
दरम्यान, सलग दोन दिवस सुरू असणाऱ्या या प्रकारामुळे पालक भीतीच्या छायेत आहेत.याबाबत ग्रामस्थांसह सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त होत आहे