सत्तारूढ गटाकडून ताकद अजमावण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:04+5:302021-03-20T04:22:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटात खिंडार पडल्याने आपल्या सोबत नेमके आहेत करी कोण? याचा अंदाज घेण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटात खिंडार पडल्याने आपल्या सोबत नेमके आहेत करी कोण? याचा अंदाज घेण्यासाठी शुक्रवारी सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी.एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संचालकांची बैठक घेतली. बैठकीला अध्यक्ष रवींद्र आपटेंसह बारा संचालक उपस्थित हाेते. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह सात संचालकांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरवली.
गेली ३५ वर्षे ‘गोकुळ’चे प्रतिनिधित्व करणारे व आमदार पी.एन. पाटील यांचे खंदे समर्थक विश्वास पाटील यांनी सत्तारूढ गटापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अनुराधा पाटील- सरूडकर, अरुण डोंगळे, जयश्री पाटील- चुयेकर, विलास कांबळे, आमदार राजेश पाटील हेही विरोधी छावणीत दाखल होणार आहेत. त्यामुळे सत्तारूढ गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेमके आपल्यासोबत कोण आहेत? याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता आमदार पी.एन. पाटील व महादेवराव महाडिक यांनी संचालकांची बैठक घेतली. तब्बल पावणेदोन तास मॅरेथॉन चर्चा झाली. सहा संचालकांनी घेतलेल्या भूमिकेवर चर्चा झाली. त्यांच्या जाण्याने पॅनलवर काय परिणाम होऊ शकतो, याची चाचपणी करण्यात आली. पर्यायी माणसे कोणी उभी करायची? याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. विरोधकांच्या रणनीतीवर आपण काय करायचे? जिल्ह्यातील इतर कोणी हाताला लागेल का? याची चाचपणीही बैठकीत झाल्याचे समजते.
संचालकांच्या चेहऱ्यावर तणाव
सत्तारूढ गटाला खिंडार पडल्याने नेत्यांसह संचालकांच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव दिसत होता. पॅनलची भक्कम बांधणीसह इतर जोडण्यांची जबाबदारी ज्येष्ठ संचालकांवर सोपविण्यात आल्याचे समजते. बैठकीला आलेल्या एका संचालकाचे अजूनही तळ्यातमळ्यात असल्याने त्यांना घेऊन काही संचालक बसल्याचे समजते.
कोट-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांसोबत आढावा घेण्यात आला. ही प्राथमिक बैठक होती, इतर काहीही चर्चा झालेली नाही.
-आमदार पी.एन. पाटील
हे संचालक होते उपस्थित
रवींद्र आपटे, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास जाधव, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, अंबरीश घाटगे, बाबा देसाई, पी.डी. धुंदरे यांच्यासह चेतन नरके, सदानंद हत्तरकी हे उपस्थित होते.
हे राहिले अनुपस्थित
विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, विलास कांबळे, जयश्री पाटील- चुयेकर, अनुराधा पाटील- सरूडकर, रामराजे कुपेकर.
फोटो ओळी :
‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ गटाची शुक्रवारी संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झाली. यावेळी आमदार पी.एन. पाटील, महादेवराव महाडिक यांच्यासह संचालक उपस्थित होते. (फोटो-१९०३२०२१-कोल-गोकुळ मीटिंग व गोकुळ मीटिंग०१) (छाया : आदित्य वेल्हाळ)