कोल्हापूर जिल्हानिहाय कामांचा आराखडा करण्याचा प्रयत्न : योगेश जाधव यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 07:04 PM2018-07-04T19:04:53+5:302018-07-04T19:06:30+5:30
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्यांचे आहे. या जिल्ह्यांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी दिली.
कोल्हापूर : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्यांचे आहे. या जिल्ह्यांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी दिली.
महामंडळाचे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. महामंडळाचे काम करताना मला कायमच ‘लोकमत’कडून सहकार्य लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संपादक वसंत भोसले यांनी या महामंडळाची रचना, उद्देश सांगितला. कोल्हापूरला जाधव यांच्या निमित्ताने या महामंडळावर काम करण्याची प्रथमच संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
जाधव म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन कामाचा आराखडा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. त्याच त्याच स्वरूपाची कामे करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील काही वेगळ्या धाटणीची कामे करण्यावर आपला भर राहील.
या महामंडळासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याने निधीची अडचण असणार नाही. या महामंडळाचा अध्यक्ष हा जिल्हा नियोजन मंडळाचाही पदसिद्ध सदस्य असतो. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांनाही उपस्थित राहून त्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावू.’ यावेळी ‘लोकमत’मधील सर्व विभागप्रमुख व बातमीदारांसमवेत त्यांनी सुमारे तासभर संवाद साधला.
शिरोळमधील कॅन्सरचे संशोधन
शिरोळ तालुक्यात मुख्यत: कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परवाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊनही सरकारचे लक्ष या गंभीर प्रश्नांकडे वळविले आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर सेंटरच्या मदतीने या तालुक्याचे नव्याने संशोधन करून या प्रश्नाची तीव्रता शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहण्याचा विचार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले.