नेत्यांच्या आदेशाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष
By admin | Published: July 21, 2016 09:07 PM2016-07-21T21:07:19+5:302016-07-21T21:07:19+5:30
मलकापूर नगरपालिका निवडणूक : सत्यजित पाटील-मानसिंगराव गायकवाड, तर काँग्रेस-जनसुराज्य एकत्र लढण्याची शक्यता
राजाराम कांबळे -- मलकापूर मलकापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये वातावरण एकदम कुल-कुल असे आहे. प्रभाग निश्चितीनंतर उमेदवार चाचपणीस वेग येईल असे वाटत होते. मात्र, शहरातील राजकीय नेतेमंडळीदेखील निवडणुकीसंदर्भात बोलण्यास तयार नाहीत. गटाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश आल्यानंतर पालिकेच्या राजकारणाला वेग येणार आहे.
पालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनसुराज्य पक्ष सत्तेत आहेत, तर शिवसेना विरोधी बाकावर आहे. विरोधी पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकायचे असते, कारण त्यांना सत्तेत नसल्याचा फायदा होतो. जनतेची सहानुभूती लाभते. मलकापूर नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस व विरोधी शिवसेना गळ्यात गळे घालून सत्तेचा उपयोग करून घेत आहेत. मागून मिळेल त्यावर समाधान मानून जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक समाधान मानत आहेत. तिन्ही गटांत निवडणुकीसाठी शांततेचे वातावरण आहे.
शाहूवाडी तालुका पातळीवर शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मानसिंगराव गायकवाड यांची युती आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी व जनसुराज्य सत्तेत असले तरी त्यांच्यात अंतर्गत कुरबुरी आहेत. जनसुराज्य पक्षाचे दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात आहेत. त्यामुळे जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांना याचा राग आहे. तालुका पातळीवरची नेत्यांची युती असल्यामुळे विरोधी शिवसेनादेखील सत्ताधारी राष्ट्रवादीसोबत फरफटत जात आहे. तिन्ही पक्षांनी प्रभाग आरक्षण सोडतीत म्हणावा तसा भाग घेतला नाही. नवीन इच्छुकांचा भरणा जास्त प्रमाणात होतो. नवीन मतदार नोंदणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन नागरिकांना आवाहन करावे लागत आहे. राष्ट्रीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी अजूनतरी केलेली दिसत नाही.
मलकापूर शहरातील अग्रगण्य समजली जाणारी मलकापूर अर्बन बॅँकेची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी बिनविरोध करून एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात सर्जेराव पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे जाणकारांचे लक्ष आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची नेतेमंडळी वाट पाहत आहेत. या आरक्षणानंतरच पालिकेच्या राजकारणाला गती येणार आहे.
पालिकेत सध्या मुख्याधिकारी यांची बदली होऊन एक महिना झाला तरी पद रिक्त आहे. प्रभारी मुख्याधिकारी यांचा चार्ज तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे देण्यात आला. मात्र, त्यांचीदेखील बदली झाल्याने पालिकेच्या निवडणुकीची तयारी कर्मचारी करीत आहेत. एकंदरीत पालिकेत राजकीय शांतता पसरली आहे. पावसाळ्याबरोबरच राजकीय वातावरण थंडा थंडा कुल कुल झाले आहे.
इच्छुकांच्या नजरा
आगामी निवडणुकीत तालुक्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार सत्यजित पाटील व मानसिंगराव गायकवाड गटाची युती होणार हे काळ्या दगडावरची रेष आहे.
त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीसाठी कोणती रणनीती ठरणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.