पन्हाळा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीच्या तारखेकडे इच्छुकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:12+5:302021-02-14T04:22:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील उंड्री ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जैसे थे ठेवल्याने पन्हाळा तालुक्यातील ...

Attention of aspirants to the date of election of Sarpanch and Deputy Sarpanch of Panhala taluka | पन्हाळा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीच्या तारखेकडे इच्छुकांचे लक्ष

पन्हाळा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीच्या तारखेकडे इच्छुकांचे लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील उंड्री ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जैसे थे ठेवल्याने पन्हाळा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींचा कारभारीपद निवडीच्या तारखेकडे आता इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे तालुक्यातील आरक्षण फेरबदलाच्या संकल्पनेला पूर्णविराम मिळाल्याने इच्छुक उमेदवारांनी गावकारभाऱ्यांसाठी फिल्डिंग लावायला जोरदार सुरुवात केली आहे. सरपंच पदाचे अनेक दावेदार असणाऱ्या ठिकाणी आपली वर्णी कशी लागेल? या जोडणीत इच्छुक आहेत.

निवडणुकीतील टोकाची ईर्षा वादंग आणि वारेमाप खर्च टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाच्या आरक्षणाची लाॅटरी निवडणुकीनंतर घेण्याचे जाहीर केले होते. निवडणुकीनंतर आरक्षणाची लाॅटरी फुटली, परंतु उंड्री ग्रामपंचायतीच्या आरक्षणावर आक्षेप घेतल्याने तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडी लांबणीवर पडल्या. त्यामुळे इच्छुकांची प्रतीक्षा आणि घालमेल वाढली आहे.

गावच्या विकासकांचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्ता बदलली, तर काही ठिकाणी सत्ता अबाधित राखण्यात गटनेत्यांना यश आले. काहींनी आरक्षण गृहित धरून निवडणुकीत गुलाल उधळला; परंतु आरक्षणाची सोडत ऐकून त्यांच्या तोडचे पाणी पळाले. निवडणुकीत गटनेत्यांनी हात जोडून उभा केलेल्यांना अनपेक्षित सरपंच पदाची लाॅटरी लागली आहे.

तालुक्यातील सरपंच पद खुले असलेल्या गावात सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. पहिल्या पसंतीसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. पाच वर्षांकरिता सरपंच, उपसरपंच पदाच्या रोटेशन फाॅर्मुल्याचे गणित लावणे गटनेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. फाॅर्मुल्याचे गणित चुकले, तर सदस्यांची खांदेपालट होऊ शकते.

निवडणुकांपूर्वी जगजाहीर होणाऱ्या सरपंच पदाचा फाॅर्मुला निवडणुकीनंतरच्या आरक्षण सोडतीने गटनेत्यांसाठी तापदायक ठरला आहे. सत्तेसाठी स्थानिक आघाड्यांनी जुळविलेले गणित सरपंचपद निवडताना विस्कळीत होत आहे. काटावरचे बहुमत असणाऱ्या ठिकाणी तारेवरची कसरत आहे. इच्छुकांनी अनेकांच्या माध्यमातून जर-तर करत आपली भूमिका गटनेत्यापर्यंत पोहोचवून गटनेत्यांची घालमेल वाढविली आहे.

Web Title: Attention of aspirants to the date of election of Sarpanch and Deputy Sarpanch of Panhala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.