दत्तवाड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:36+5:302021-03-16T04:24:36+5:30

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसंदर्भात अद्याप घोषणा झाली नसली ...

Attention to Dattawad Zilla Parishad by-election | दत्तवाड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीकडे लक्ष

दत्तवाड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीकडे लक्ष

Next

जयसिंगपूर :

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसंदर्भात अद्याप घोषणा झाली नसली तरी इच्छुकांनी मात्र आतापासूनच जाेर-बैठका काढायला सुरुवात केली आहे. याशिवाय दानोळी पंचायत समिती तर अब्दुललाट, राजापूर, राजापूरवाडी ग्रामपंचायतीतील चार जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. शिवाय, शिरोळ नगरपालिकेत एका जागेसाठी पोटनिवडणूक लागणार आहे. घोसरवाड सरपंचपदाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखेकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. जि. प. सदस्य प्रवीण माने यांचे निधन झाल्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषदेची जागा रिक्त आहे. नुकत्याच दत्तवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इच्छुकांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार केला आहे. शिवाय, काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतही उत्सुकता असली तरी यड्रावकर गट, भाजपाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

दानोळी पंचायत समितीचे सदस्य सुरेश कांबळे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेविरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र अपेक्षित आहे. अब्दुललाट ग्रामपंचायतीत तीन, राजापूर एक व राजापूरवाडी ग्रामपंचायतीतील दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. शिरोळ नगरपालिकेत भाजपाचे नगरसेवक दादासाहेब कोळी यांचे पद अपात्र ठरल्याने या जागेची देखील पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीनंतर वर्षभराच्या आत जातीचा दाखला दिला नसल्याने कोळी यांचे नगरसेवक पद अपात्र ठरले होते. या एका जागेसाठी काँग्रेस, यड्रावकर गट, स्वाभिमानीप्रणीत शाहू आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित आहे. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या पोटनिवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

चौकट - घोसरवाडचा मार्ग मोकळा

सरपंच आरक्षण सोडतीत घोसरवाडला अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण जाहीर झाले होते. मात्र, या पदाचा सदस्य नसल्याने ही जागा रिक्त राहिली होती. अनुसूचित जमाती महिलाऐवजी अनुसूचित जमातीच्या सदस्याला सरपंचपद देण्याबाबत कार्यवाही झाली असून सरपंच निवडीच्या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Attention to Dattawad Zilla Parishad by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.