शिवपुतळ्याच्या जागेबाबत शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:21+5:302021-02-25T04:29:21+5:30
जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेनेच शिवपुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याने जागा भूसंपादनाबरोबरच म्युझियम बांधण्याचा प्रश्नही आता मार्गी लागणार आहे. ३ कोटी ...
जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेनेच शिवपुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याने जागा भूसंपादनाबरोबरच म्युझियम बांधण्याचा प्रश्नही आता मार्गी लागणार आहे. ३ कोटी १० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याबद्दल शाहू व ताराराणी आघाडीचा सत्कार शिवप्रेमींनी केला आहे. त्यामुळे येत्या १३ मे पर्यंत भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे.
शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न ५० वर्षांपासून रखडला आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी वसविलेल्या या शहरात शिवरायांचा पुतळा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सांगली-कोल्हापूर मार्गावर जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ शिवपुतळा उभारण्यासाठी जागा आरक्षित आहे. सध्या ही जागा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे. जागा संपादनासाठी सव्वादोन कोटी रुपये शासनाला भरावे लागणार असल्याने विनामोबदला ही जागा मिळावी, यासाठी शिवप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जागेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यातच महाराष्ट्र शासनाने २०१५ साली श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल फाउंडेशनचे नाव या आरक्षित जागेवरून काढून टाकल्याचे पुढे आले. त्यामुळे शिवप्रेमींतून नाराजी दिसून आली. कोणत्याही परिस्थितीत १९ फेब्रुवारीला शिवपुतळ्यासाठी भूमिपूजन करण्याची भूमिका शिवप्रेमींनी घेतली. मात्र, नगराध्यक्षा डॉ. नीता माने व उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी जागेबाबत शासनाने महसूल माफ केला नाही, तर नगरपालिकेकडून हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले. दरम्यान, येत्या १३ मे पर्यंत भूसंपादनाचा प्रश्न मिटला नाही, तर अक्षय तृतीयेला शिवपुतळ्यासाठी भूमिपूजन करू, असा इशारा शिवप्रेमींनी दिला.
........
जागेसाठी साकडे
नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने पहिल्या टप्प्यात शिवपुतळ्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्याकडूनही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. पालिकेने विनामोबदला जागा मिळावी, यासाठी शासनालाही साकडे घातले आहे. त्यामुळे शासनस्तरावर कोणता निर्णय होतो, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.