लक्ष दादांच्या निर्णयाकडे
By admin | Published: February 16, 2015 12:08 AM2015-02-16T00:08:19+5:302015-02-16T00:14:51+5:30
जिल्हा बँक : सहकारमंत्र्यांकडे आज सुनावणी
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांच्या याचिकेवर आज, सोमवारी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये सहकारमंत्री नेमका कोणता निर्णय देतात याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विनातारण, अल्पतारण कर्जवाटप केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालक अशा ४६ जणांवर १४७ कोटींची जबाबदारी निश्चित केली. विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी व्यक्तीनिहाय जबाबदारी निश्चित केलेल्या रकमा भरण्यासाठी माजी संचालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. सहनिबंधकांच्या कारवाईविरोधात काँग्रेसच्या माजी संचालकांनी प्रथम सहकारमंत्र्यांंकडे, तर नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या माजी संचालकांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर गुरुवारी (दि. १२) सुनावणी होऊन माजी संचालकांची याचिका फेटाळली. सहकार विभागाच्या कारवाईविरोधात सहकारमंत्र्यांकडे याचिका दाखल करणे अपेक्षित असते, पहिल्यांदा तिथे दाखल करा आणि सहकारमंत्र्यांच्या निकालावर याचिका दाखल करा, असे आदेश न्यायालयाने दिले. सहकारमंत्र्यांना यावर १६ फेबु्रवारीला सुनावणी घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सहकारमंत्र्यांनी यापूर्वीच कारवाईचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय निर्णय होणार याचा अंदाज माजी संचालकांनाही आहे. (प्रतिनिधी)