‘विफा’च्या आज होणाऱ्या बैठकीकडे राज्यातील फुटबाॅलप्रेमींचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:45+5:302020-12-29T04:22:45+5:30
कोल्हापूर : राज्याची फुटबाॅलमधील शिखर संस्था म्हणून वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशन (विफा) कडे पाहिले जाते. या संघटनेशी सोमवारी (दि. ...
कोल्हापूर : राज्याची फुटबाॅलमधील शिखर संस्था म्हणून वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशन (विफा) कडे पाहिले जाते. या संघटनेशी सोमवारी (दि. २८) राज्यातील फुटबाॅल हंगाम सुरु करण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे कोल्हापूरसह राज्यातील फुटबाॅलप्रेमींचे लक्ष लागले आहे.
विफाच्या मुंबई येथील मुख्यालयात सोमवारी अध्यक्ष व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील फुटबाॅल हंगाम सुरु करण्यासंदर्भात कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्यात फुटबाॅलचा नवा हंगाम कधी व कोणत्या स्वरुपात सुरु करण्यासंबंधी मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे. या शिखर संस्थेकडे नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर अशा संघटनांची संलग्नता आहे. या संघटनेत मालोजीराजे छत्रपती (कोल्हापूर), डाॅ. विश्वजीत कदम (पुणे), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (मुंबई ), पार्थ जिंदाल (पालघर), हरिश व्होरा (नागपूर) हे पाचजण उपाध्यक्ष आहेत, तर मुंबईच्या सहा विभागातून ३०० पुरुषांचे संघ व १२ महिलांचे संघ, तर नागपूर - १०, औरंगाबाद, पुणे - १६, ठाणे, कोल्हापूर - ८, पालघर, नाशिकसह वरिष्ठ गटातील ३६९ संघांसह खेळाडूंचीही नोंदणी या संघटनेकडे आहे. त्यामुळे संघटनेकडून हिरवा झेंडा दाखविल्यानंतरच सर्वत्र नव्या वर्षात २०२१ मध्ये नवा फुटबाॅल हंगाम सुरुवात होण्याची शक्यता आहे.
....
चौकट
विफाच्या अधिकृत संकेतस्थळावर फुटबाॅलपटू किक ऑफ करण्याच्या तयारीत दाखविण्यात आला आहे. याशिवाय त्याखाली किकिंग ऑफ सून असे इंग्रजीत वाक्य लिहिले आहे. त्यामुळे लवकरच हंगाम सुरु होईल, अशी आशा राज्यातील तमाम फुटबाॅलप्रेमींना वाटत असल्याने त्याची चर्चा कोल्हापूरसह राज्यभरातील फुटबाॅल चाहत्यांमध्ये आहे.