सीसी कॅमेऱ्यांद्वारे मोर्चावर लक्ष

By admin | Published: October 11, 2016 12:15 AM2016-10-11T00:15:20+5:302016-10-11T00:20:10+5:30

मराठा क्रांती मोर्चा : जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी घेतली आढावा बैठक, सर्व तयारी गुरुवारपर्यंत पूर्ण करा

Attention on the Front by CC Cameras | सीसी कॅमेऱ्यांद्वारे मोर्चावर लक्ष

सीसी कॅमेऱ्यांद्वारे मोर्चावर लक्ष

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात होणाऱ्या संपूर्ण मोर्चावर शहरातील ‘सेफ सिटी’च्या सीसी टीव्ही कॅमेरांद्वारे लक्ष ठेवणार असून, गोंधळ अगर आक्षेपार्ह घटना घडल्यास त्वरित वॉकीटॉकीवरून घटनास्थळी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. वेगाने कामाला लागा, मोर्चाची सर्व तयारी गुरुवारपर्यंत (दि. १३) पूर्ण करा, शुक्रवारी (दि. १४) पुन्हा आढावा घेऊन त्रुटी दूर करू, अशाही सूचना त्यांनी कोअर कमिटीला केल्या.
येत्या शनिवारी (दि. १५) कोल्हापुरात होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सैनी आणि कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सदस्यांना सूचना केल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी, मोर्चाची १३ आॅक्टोबरपूर्वी सर्व तयारी करावी, अशी सूचना मांडली. १४ रोजी सकाळी तयारीचा आढावा घेऊ, त्या अनुषंगाने पाहणी करून सायंकाळी त्रूटी दूर करू, असेही त्यांनी सुचविले. मोर्चाच्या तयारीसाठी दिवस कमी राहिले असल्याने कोणतीही उणीव मागे ठेवू नका, जलद काम करा असेही ते म्हणाले. या बैठकीस, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘सीपीआर’कडील दोन मार्ग रिकामे ठेवा
मोर्चा मार्गावर वैद्यकीय पथकासह सुमारे ३५ खासगी रुग्णवाहिका कार्यरत असतील, अशी माहिती देण्यात आली; पण यामध्ये जिल्ह्णातील १०८, १०२ आणि महापालिकेच्या रुग्णवाहिकांचीही मदत घ्यावी. याशिवाय बाहेरील जिल्ह्णातील रुग्णवाहिकाही मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी देऊन सीपीआरकडे जाणारे भवानी मंडप ते सीपीआर (भाऊसिंगजी रोड मार्गे) व जिल्हाधिकारी कार्यालय ते सीपीआर दोन मार्ग (ग्रीन चॅनेल) रिकामे ठेवावेत, अशीही मागणी केली. शिवाजी तरुण मंडळामध्येही डॉक्टरांचे पथक सज्ज राहणार आहे.
मोर्चा दिवशी ‘ड्राय डे’
मोर्चा दिवशी दिवसभर सर्व मद्याचे व्यवसाय बंद ठेवून ‘ड्राय डे’ करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी बैठकीत घोषित केले.
नागरिकांसाठी मंगल कार्यालये खुली
मोर्चाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी अनेक नागरिक कोल्हापुरात मोठ्या संख्येने येणार असल्याने त्यांना रात्रीच्या वेळी राहण्यासाठी तसेच मोर्चादिवशी दिवसभर या सर्व मंगल कार्यालयातील स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी जाहीर केले.
३२ टॉवर, तीन व्यासपीठे
मोर्चा मार्गावर अगर एकत्र येण्याच्या ठिकाणी असे एकूण ३२ टॉवरसह गांधी मैदान आणि ताराराणी चौक या दोन ठिकाणी व्यासपीठ मोफत बांधून देण्याचे आश्वासन कोल्हापूर मंडप डेकोरेशन असोसिएशनने जाहीर केले. पण, शिवाजी विद्यापीठ परिसरातही मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा होणार असल्याने तेथेही आणखी एक व्यासपीठ असावे,अशीही कोअर कमिटीने केलेली सूचना जिल्हाधिकारी यांनी मान्य केली.
रस्त्यातील बंद वाहने उचलणार
मोर्चा मार्गावर रस्त्याकडेला गेली काही महिने बंद स्थितीत थांबलेली वाहने काढावीत, अशी सूचना काहींनी बैठकीत मांडली. यावेळी ही सर्व वाहने शहर वाहतूक शाखेच्या मदतीने हटवू, असे आश्वासन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.
एस.टी., के.एम.टी.चे अधिकारी पार्किंग सेवेत
मोर्चादिवशी केएमटीचे कर्मचारी हे मोर्चात सहभागी होणार, तर सुमारे २०० अधिकारी हे पार्किंगची सेवा बजावणार आहेत. नागरिकांना घेऊन येणाऱ्या एस.टी. बसेसही पार्किंग जागेतच थांबवावी. पण, पार्किंग जागेत एस.टी.ला पार्किंगसाठी प्राधान्य द्यावे, अशी सूचना एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मांडली. या पार्किंगसेवेसाठी एस.टी.ची आठ पथके कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे, अशीही माहिती एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी दिली.


२०० स्पिकर, पाच स्क्रीन, ‘वॉकीटॉकी’चाही वापर
मोर्चाची माहिती, सूचना शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावी, संपूृर्ण मोर्चा मार्गावर सुमारे २०० स्पिकर तसेच वेगवेगळ्या मोक्याच्या पाच ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. याशिवाय ‘सेफ सिटी’ योजनेच्या सीसीटीव्ही यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय ५० ‘वॉकीटॉकी’चाही वापर करण्यात येणार आहे. या सर्वांचे नियंत्रण जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात आले असून, या ठिकाणी प्रत्येकाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कोअर कमिटीचे एक पथक तैनात ठेवले जाणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने दिली.
डॉक्टरांची संख्या वाढवा
या मोर्चा मार्गावर सुमारे ३०० डॉक्टरांची पथके राहणार आहेत, तर वाहने पार्किंग ठिकाणी ५० डॉक्टरांची यंत्रणा सज्ज राहणार आहे, असे कोअर कमिटीने सांगितले. यावेळी डॉक्टरांची संख्या अपुरी पडणार असून, ती आणखी वाढवावी अशी सूचना डॉ. सैनी यांनी करून प्रशासनातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्या, रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, असेही त्यांनी सुचविले.


बारा वाहनांचा विचित्र अपघात
पडवळवाडीजवळील घटना : सहा जखमी, चार ट्रक, पाच दुचाकी, तीन चारचाकींचा समावेश
पोर्ले तर्फ ठाणे : अपघातग्रस्त वाहनाला पाहताना एकमेकांवरती पाठीमागून आदळल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पडवळवाडी (ता. करवीर) ते नलवडे बंगला दरम्यानच्या ओढ्यावरती १२ वाहनांचा विचित्र अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पडवळवाडी ते नलवडे बंगला दरम्यानच्या पारशेत ओढ्यात रविवारी (दि. ९) रात्री अज्ञात वाहनाने बोलेरो व स्कुटीला मागून धडक दिल्याने बोलेरो गाडी ओढ्यात गेली होती. सोमवारपासून अपघातग्रस्त गाडी पाहण्यासाठी तेथे वाहनांची व बघ्यांची गर्दी होत होती. या वळणावर सोमवारी स. ११ वाजता जयगडवरून मालवाहक ट्रक येत होता.
अचानक गर्दी पाहून पहिल्या ट्रकने वेग कमी केला, पण मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिली. त्याच क्षणी बॉक्साईट भरलेल्या तिसऱ्या ट्रकच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात, कोल्हापूरहून येणाऱ्या स्विफ्ट डिझायरला धडक दिली. त्यामुळे स्विफ्ट गाडी मालक व ट्रक ड्रायव्हर यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यांची हातघाई सुरू असतानाच चौथ्या ट्रकने विनाचालक उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे तो ट्रक २०० फूट पुढे गेला. त्यामुळे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार दुचाकी ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. विनाचालक धावत येणारा ट्रक पाहून दुचाकीस्वारांनी गाड्या तेथेच सोडून जीव वाचविला. मात्र, कोल्हापूरहून बांबवडेकडे प्रवासी घेऊन चाललेल्या व्हॅनला त्या ट्रकने २00 फूट फरफटत नेले. तो ट्रक ओढ्याच्या संरक्षण कठड्याला धडकून थांबला. या विचित्र अपघातात सहाजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पडवळवाडीचे माजी उपसरपंच पंडित नलवडे यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची सोय केली. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Attention on the Front by CC Cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.