पाचगावात इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष
By Admin | Published: September 29, 2016 12:26 AM2016-09-29T00:26:14+5:302016-09-29T00:31:58+5:30
जि.प.,पं.स. निवडणूक : पुनर्रचनेमुळे येणार रंगत; पक्षांसह गटांचीही तयारी
ज्योती पाटील-- पाचगाव -पाचगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची लगबग सध्या पाचगाव परिसरात सुरू असून, या तयारीची त्याची चर्चा सध्या गावागावात रंगत आहे. आरक्षणाच्या तारखा जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवातदेखील केली आहे. सध्या आमदार सतेज पाटील गटाचे या मतदारसंघात वर्चस्व असले तरी या निवडणुकीत या ठिकाणी सर्वच पक्षांनी शड्डू ठोकल्याचे सध्या तरी चित्र आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा व जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा पाचगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आहे. शिवसेनेचे नेतेही या प्रभागात अगोदरपासूनच सत्ता काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे पाचगाव जि.प. व पं.स. मतदारसंघात राजकारणाची वेगळीच रंगत सध्या पाहावयास मिळत आहे. अनेक मातब्बर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत; परंतु उमेदवाराचे आरक्षण काय पडते, यावर सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे. अशातच मतदारसंघामध्ये नवीन गावांचा समावेश झाल्याने अगोदर समाविष्ट असणाऱ्या गावांमध्ये संपर्क व केलेल्या कामाचे कष्ट बहुधा वायाच गेल्याचे चित्र स्पष्ट आहे. सध्याच्या पुनर्रचनेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये छुप्या पद्धतीने इच्छुक उमेदवारांची चाचपणी चालू असून, त्यांनी पक्षाकडेसुद्धा उमेदवारीसाठी वर्णी लागण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. आरक्षण जाहिर होताच इच्छुकांची यादी करता यावी, यासाठी पक्षांनीही आत्तापासूनच कोण इच्छुक आहे, कोणाचा संपर्क कसा आहे, यांचीही कार्यकर्त्यांकरवी चाचपणी सुरूकेली आहे. कोणाला उमेदवारी दिल्यास किती नाराज होतील, त्याचा परिणाम काय होईल, याची चर्चाही पक्षपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने आता या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबा, हणबरवाडी व जैताळ या गावांचा प्रामुख्याने समावेश झाला आहे. तसेच पाचगाव व कळंबा असे दोन पंचायत समिती मतदारसंघ तयार केले आहेत.
सतेज पाटील, धनंजय महाडिक यांचेच वर्चस्व
या ठिकाणी गटातटाचे राजकारण जास्त प्रमाणात असले तरी आमदार सतेज पाटील व महाडिक यांच्या गटांचे सरासरी वर्चस्व अधिक आहे. सध्या विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी अनेक विकासकामांचा डोंगर रचून आगामी जि.प., पं.स.साठी व्यूहरचना तयार केली आहे. त्यापाठोपाठ दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी गावागावांमध्ये विकास करून लोकांना संघटित ठेवण्याचे काम केले आहे.