कोल्हापूरकरांचे राही, तेजस्विनी, स्वरूप यांच्या कामगिरीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 01:42 PM2021-07-19T13:42:26+5:302021-07-19T13:44:04+5:30
कोल्हापूर : भारतीय नेमबाजी संघ टोकियो ऑलिम्पिकनगरीत शनिवारी दाखल झाला. या संघात कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत ...
कोल्हापूर : भारतीय नेमबाजी संघ टोकियो ऑलिम्पिकनगरीत शनिवारी दाखल झाला. या संघात कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आणि पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर या तिघांचा समावेश आहे. नेमबाजीचे सर्व सामने २३ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणार आहेत. त्यामुळे तमाम कोल्हापूरकरांचे डोळे त्यांच्या कामगिरीकडे आतापासून लागले आहेत.
टोकियो ऑलिम्पिकचे पडघम वाजू लागले आहेत. त्यात कोल्हापूरच्या तिघांचा भारतीय ऑलिम्पिक नेमबाजी संघात समावेश आहे. तिघांचाही प्रथमच ऑलिम्पिक संघात समावेश झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या पदकाच्या आशा वाढल्या आहेत. २३ जुलै ते २ ऑगस्टमध्ये राहीचा २५ मीटर पिस्तल प्रकारचा इव्हेंट २८ ते २९ आणि तेजस्विनीचा ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंट ३० जुलैला भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ५.३० ते ९.०० वाजेपर्यंत आहे. तर पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील स्वरूप उन्हाळकरचा इव्हेंट ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहेत.
कोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमान
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी स्टेडियममधील क्रीडा कार्यालय, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौक, एस.एम. लोहिया हायस्कूल परिसर आदी ठिकाणी तेजस्विनी, राही आणि स्वरूप यांचे ह्यकोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमानह्ण डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.