जयसिंगपूरच्या राजकीय सर्जिकलकडे लक्ष

By admin | Published: November 18, 2016 01:08 AM2016-11-18T01:08:39+5:302016-11-18T01:04:57+5:30

पालिकेचे रणांगण : ‘आप्पा’ किंगमेकर ठरणार का?, यड्रावकरांची सावध भूमिका

Attention to the political surgeon of Jaysingpur | जयसिंगपूरच्या राजकीय सर्जिकलकडे लक्ष

जयसिंगपूरच्या राजकीय सर्जिकलकडे लक्ष

Next

संदीप बावचे -- जयसिंगपूर  नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झाल्यानंतर शहरात आता राजर्षी शाहू विकास आघाडीविरुद्ध ताराराणी आघाडी पक्ष अशी काट्याची लढत पाहावयास मिळणार आहे. यड्रावकरांना शह देण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली असून, नगरपालिकेच्या या निवडणुकीत कोण कोणाचे राजकीय सर्जिकल आॅपरेशन करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेवराव महाडिक यांनी यड्रावकरांना शह देण्यासाठी महाडिक गटासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, भाजप, जनसुराज्य पक्ष व शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्याशी वाटाघाटी करून ताराराणी आघाडी पक्षाखाली उमेदवारांची बांधणी केली आहे. विधानपरिषदेला महाडिकांना जयसिंगपुरातून बळ मिळत होते. मात्र, गतवर्षी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव महाडिक गटाला जिव्हारी लागल्यामुळे जयसिंगपुरात सत्तांतर हेच टार्गेट कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाडिक यांनी दोनवेळा शिरोळ तालुक्याचा दौरा केला होता. सा. रे. पाटील गट वगळता त्यांचा हा दौरा यशस्वी झाला.
महाआघाडीत नेते एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत पालिकेत सत्तांतर घडविण्याचा चंग आता ताराराणी आघाडी पक्षाने बांधला आहे. येत्या २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचारसभांच्या तोफाही धडाडणार आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून शहराचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे. विरोधी आघाडीची मोट बांधण्यात महाडिक पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरले असले तरी जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत कोण कोणाचे राजकीय सर्जिकल आॅपरेशन करणार याकडे लक्ष लागले आहे.


पुन्हा शाहू आघाडीची मोट
शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या आघाडीची पालिकेत एकतर्फी सत्ता आहे. गेल्या साडेचार वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून एक मॉडेल शहर अशीच शहराची ओळख निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. विरोध ग्रहीत धरून शाहू आघाडीने पुन्हा एकदा यड्रावकर व सा. रे. पाटील गटाची मोट बांधली आहे.
विकासाचा मुद्दा चर्चेत
ताराराणी आघाडी पक्षाने सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी टीकेची झोड उठवायला सुरू केले आहे. सत्तेच्या जोरावर विकास कामांचा खोटा डांगोरा पिटून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूरचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा गाजत आहे.

शिट्टी कोणाची घुमणार
जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक यांची खास स्टाईलमधील शिट्टी सर्वांनाच परिचित आहे. बेरजेचे राजकारण साधून महाडिक यांनी जयसिंगपुरात मोट बांधली असली तरी जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे. यामुळे नेमकी शिट्टी कोणाची घुमणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून
राहिले आहे.

Web Title: Attention to the political surgeon of Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.