गणपतराव पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:06+5:302020-12-17T04:47:06+5:30
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सा. रे. पाटील गटाच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. माजी ...
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सा. रे. पाटील गटाच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. माजी आमदार सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्म त्यांनी पाळला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक आघाड्यांना महत्त्व असले तरी गटातटाचे राजकारण मोठे चालते. सहकाराच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात विकासगंगा पोहोचविण्याचा प्रयत्न स्व. सा. रे. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन गणपतराव पाटील काम करीत आहेत. काँग्रेसला दिशा देण्याचेही ते काम करीत आहेत. वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेसाठी गणपतराव पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. मात्र, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळला. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सा. रे. पाटील गटाने स्वतंत्र भूमिका घ्यावी, अशी कार्यकर्त्यांतून मागणी होत आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म सोडून काँग्रेसला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तालुक्यात सा. रे. पाटील गटाचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीमध्ये गणपतराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
फोटो - १६१२२०२०-जेएवाय-०१-गणपतराव पाटील