मालोजीराजेंची ‘ताकद’ कुणाला याकडे लक्ष
By admin | Published: October 27, 2015 12:56 AM2015-10-27T00:56:18+5:302015-10-27T01:11:04+5:30
पंचरंगी लढत : उमेदवार संख्या जास्त असल्याने मतविभागणी ठरणार महत्त्वाची--बिग फाईट
रमेश पाटील- कसबा बावडा--तब्बल १५ वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुला झालेल्या व मालोजीराजे यांचे वर्चस्व असलेल्या रमणमळा प्रभागात पंचरंगी लढत होणार असून, मालोजीराजेंची ‘ताकद’ कुणाच्या पाठीमागे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तथापि शिवसेनेच्या उमेदवारामुळे येथे चुरस रंगतदार होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
‘रमणमळा’ प्रभागात विद्यमान नगरसेवक राजाराम गायकवाड हे ताराराणी आघाडीतर्फे रिंगणात उतरले आहेत. गेली दहा वर्षे ते नगरसेवक आहेत. प्रभाग खुला झाल्याने गायकवाड यांनी इतरांना संधी द्यायला पाहिजे होती, असा प्रचार विरोधकांकडून सुरू आहे. गायकवाडना मात्र आपण भागात केलेल्या विकासकामाच्या जोरावर सहज निवडून येऊ असा आशावाद आहे. विरोधी सर्व गटाच्या उमेदवारांनी त्यांना खिंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना केली आहे. मात्र, तरीही गायकवाडांनी आपला प्रचार नेटाने सुरू ठेवला आहे. प्रचारातही त्यांची आघाडी आहे.
माजी नगरसेवक आप्पासो बेडगकर हे चिरंजीव चंद्रशेखर बेडगकर यांना शिवसेनेची उमेदवारी घेऊन रिंगणात आहेत. सध्या या भागात शिवसेनेच्या उमेदवारांनी वातावरण निर्माण केले आहे. प्रभाग गेली १५ वर्षे आरक्षित होता. आता सर्वसाधारण प्रभाग झाल्याने ही संधी सोडायची नाही, असा चंग बेडगकर यांनी बांधला आहे. गल्लोगल्ली, कॉलन्या, बोळ आणि चौक पिंजून काढण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. सुशिक्षित, तरुण मतदारांचा तसेच ज्येष्ठांचा आपल्याला पाठिंबा असल्याने ही निवडणूक आपण एकतर्फी जिंकू, असा आशावाद बेडगकरांना आहे.
काँग्रेसने संदीप उर्फ पप्पू सुरेश सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या सरनाईक यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. संदीप सरनाईक हे माजी मंत्री सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांनी त्यांना उमेदवारी देवून प्रचारासाठी यंत्रणाही कामाला लावली आहे. सरनाईकांनी प्रभागात आपले चांगलेच वातावरण निर्माण केले आहे.
राष्ट्रवादीने गणपत रामचंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पाटील यांचा प्रचार आहे. नेहमी सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या पाटील यांनी ‘घर टू घर’ असा प्रचार राबवून भागात चांगले वातावरण केले आहे. मालोजीराजेंचे समर्थक अशोक जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जाधव हे अपक्ष जरी असले तरी प्रभागात त्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. त्यांचा प्रचार जोरात सुरू असल्याने इतरांना त्यांची दखल घ्यावी लागत आहे.
येथे पंचरंगी लढत असली तरी मालोजीराजेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीपासून काहीसे अलिप्त असलेले मालोजीराजे आपली ताकद नेमकी कोणाच्या मागे लावणार, त्या उमेदवाराला निवडून येण्याची संधी जास्त आहे.