Kolhapur: शेतकरी संघाच्या इमारतीत भाविकांचा कोंडमाराच, कृती समितीने असुविधांकडे वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:48 AM2023-10-12T11:48:00+5:302023-10-12T11:48:20+5:30
नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनरांग या इमारतीमधून सुरू होणार
कोल्हापूर : नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकरी संघाची इमारत घेतली खरी, मात्र या इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही, पुरेशा सूर्यप्रकाश नाही, इलेक्ट्रिक ऑडिट नाही, अग्निशामक साहित्याचा अभाव, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशा असंख्य असुविधा असताना या इमारतीत भाविकांना उभे करून त्यांचा कोंडमारा का करता? असा सवाल कोल्हापूर शहर कृती समितीने बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांना केला. कृती समितीचे बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार यांनी या इमारतीमधील अनेक असुविधांची पोलखोलच केली.
नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनरांग या इमारतीमधून सुरू होणार आहे. तशी व्यवस्था या इमारतीमध्ये केली आहे. मात्र, या इमारतीत भाविकासांठी कोणत्याच सुविधा नसल्याचे लक्षात येताच कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी या इमारतीची पाहणी केली. या इमारतीमध्ये एका वेळी दोन हजार भाविकांना दर्शन रांगेत उभे राहता येणार असल्याचे देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले.
मात्र, इतक्या कमी जागेत भाविकांना कसे उभे करणार? काही दुर्घटना घडून चेंगराचेंगरी झाली तर याला जबाबदार कोण, असा सवाल इंदूलकर यांनी केला. या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय? या प्रश्नावर अधिकारीही निरुत्तर झाले. जागेची क्षमता, भाविकांची संख्या, फायर ऑडिट याचा कोणताच अभ्यास न करता या इमारतीत भाविकांसाठी दर्शनरांग का केली?, बाहेर इतकी मोठी जागा असताना असुविधा असणारी इमारत ताब्यात घेण्यामागे प्रशासनाचे काळंबेरं दिसत असल्याचा आरोप इंदूलकर यांनी केला.
भाविकांसाठी अवघे अवघे आठ शौचालय
या इमारतीत पुरुषांसाठी पाच तर महिलांसाठी तीन शौचालये उभी केल्याचे देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या इमारतीत एकावेळी दर्शनरांगेतील भाविकांची संख्या पाहता ही शौचालये अपुरी पडतील याकडे कृती समितीने लक्ष वेधले. दर्शनरांगेतील भाविकांसाठी लाकडी बाकडे ठेवण्याच्या मागणीला देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली.