डोंगरकपारीतील फार्महाऊसचे आकर्षण -: कृषी पर्यटन बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:41 AM2019-05-17T00:41:09+5:302019-05-17T00:42:46+5:30

शिवाजी सावंत । गारगोटी : तीन संतांच्या वास्तव्य आणि संजीवन समाधीने पावन झालेला, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला, सात ...

Attractions of farmhouse of farmland: - Agricultural tourism flourished | डोंगरकपारीतील फार्महाऊसचे आकर्षण -: कृषी पर्यटन बहरले

फये येथे निसर्गरम्य ठिकाणी साकारत असलेले फार्महाऊस.

googlenewsNext
ठळक मुद्देशहरवासीयांच्या विश्रांतीचे, विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण; जंगलाची भुरळ

शिवाजी सावंत ।
गारगोटी : तीन संतांच्या वास्तव्य आणि संजीवन समाधीने पावन झालेला, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला, सात वीरांच्या हौतात्म्याने पुनीत झालेला, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला, जंगलाने व्यापलेला, विविध प्रकारच्या भौगोलिक रचनेमुळे दिमाखदार असलेला भुदरगड तालुका कृषी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत वेगाने विकसित होत आहे. डोंगर कपारीतून साकारलेली फार्महाऊस शहरी पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

डोंगर-दऱ्यांच्या कुशीत आणि वेदगंगा नदीच्या दुतर्फा बहुतांश तालुका वसलेला आहे. पाटगावसह फये, मेघोली, कोंडुशी, चिकोत्रा यांसारख्या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. डोंगराच्या कडेकपारी वृक्षवेलींनी आच्छादलेल्या आहेत. १९८० पर्यंतच्या दशकात अनेक गावांना वीज, रस्ते नसल्याने दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यानंतरच्या काळात वीज आली तर १९९५ च्या दशकात पक्के रस्ते, धरणाच्या उंचीत वाढी झाल्या.

तालुक्यातील बरेचजण मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यांसारख्या शहरात पोट भरण्यासाठी जाऊन स्थिरावले आहेत. सुटीत गावी येताना कधीतरी आपल्या शेजाºयाला किंवा मित्राला घेऊन यायचे, तर कधी लग्न, साखरपुडा, वास्तुशांतीसारख्या समारंभात येणं व्हायचे. हिरव्यागार वातावरणाला दुरावलेले शहरवासीय येथील हिरवागार भूप्रदेश, स्वच्छ हवा व चवदार पाण्यामुळे ते तालुक्याच्या प्रेमात पडायचे.
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी अतिक्रमणाला कंटाळलेला मानव पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाण्यासाठी आतुरला आहे. शहरात राहणाऱ्यांना खेड्यात जाऊन खापरीच्या घरात, चुलीवरच्या भाकरीची चव हवीहवीशी वाटू लागली आहे. भुदरगड तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने माणसे फोन बाजूला सारून एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंग होतात.

शहरातील धावपळ आणि प्रदूषणाला कंटाळलेला शहरवासीय मनाला विरंगुळा शोधण्यासाठी मित्राच्या फार्महाऊसवर ओळखीने मेहरबानीवर राहण्यासाठी येऊ लागला; पण असे राहण्यापेक्षा व्यावसायिक ठिकाणी राहून दोन-तीन दिवस आराम करावा या विचारातून अनेक ठिकाणी फार्महाऊस भाड्याने मिळेल का? अशी विचारणा होऊ लागल्याने मानी, मठगाव, शिवडाव, फये या ठिकाणी शेतकºयांनी कृषी पर्यटनस्थळे विकसित केली आहेत. रस्त्याच्या कडेला अथवा ज्या ठिकाणी चारचाकी जाते अशा ठिकाणी निसर्गाने निर्माण केलेले भौगोलिक स्थान, झाडे, नाले, ओढा जसेच्या तसे ठेवून त्यामध्ये ही घरे साकारली आहेत. येथून एक किंवा दोन किमी अंतरावर जंगल, धरण आहे. जैवविविधता असल्याने जंगलातील काही वृक्षवेली सदाहरित आहेत. रातकिड्यांची किरकिर, गव्याचे व अन्य पशुपक्ष्यांचे दर्शन सहज शक्य आहे.

फये येथील कृषी पर्यटनाचे फार्महाऊसचे मालक सचिन देसाई म्हणाले, आम्ही बºयाचदा कामानिमित्त शहरात जात असतो. यावेळी अनेकांनी आम्हाला यासंदर्भात विचारले. त्यामुळे प्रारंभी स्वत:साठी बांधलेले फार्महाऊस लोकांना मोफत उपलब्ध करून देत होतो. परंतु, ते लोक उपकाराच्या भावनेतून पुन्हा येण्यासाठी धजावत नव्हते. त्यांनी पैसे देऊन राहण्याची तयारी दर्शविली. मग शेतात आठ ते दहा छोटी कोकणी पद्धतीची कौलारू घरे बांधण्याचे काम सुरू केले असून, लवकरच लोकांच्या सेवेसाठी खुले केले जाईल. या फार्म हाऊसची माहिती आणि संपर्क एसटी आगाराच्या आवारातील फलकावर लावणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाºया पर्यटकांची गैरसोय होणार नाही.

निसर्गाच्या कुशीत राहण्याची संधी
सिमेंटची जंगले पाहून वैतागलेली नवी पिढी निसर्गाचा अगाध खजिना पाहून प्रसन्न होऊन जाते. मुंबई, पुणे, कोल्हापूर इथले अनेक शौकीन आज या ठिकाणी दोन-चार दिवस राहण्यासाठी येत आहेत. येथे मिळणारे चुलीवरचे जेवण, बांबूची घरे, फिरण्यासाठी जंगल याचा मनसोक्तआनंद मिळवीत आहेत. दिवसेंदिवस या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेक तरुण आपल्या जमिनीत कृषी पर्यटनाची संकल्पना राबवत आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणी नवीन फार्महाऊस बांधण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अशा निसर्गाच्या कुशीत राहण्यासाठी एकदा आवश्य भेट देण्याची आणि ग्रामीण जीवन अनुभवण्यात मजा आहे.


 

Web Title: Attractions of farmhouse of farmland: - Agricultural tourism flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.