आवळे-आवाडे दिलजमाईचा प्रयत्न निष्फळ

By admin | Published: February 7, 2017 12:59 AM2017-02-07T00:59:03+5:302017-02-07T00:59:03+5:30

राजू शेट्टी यांनी केली होती शिष्टाई : निवडणूक निमित्ताने शेट्टी-आवाडेंचा जिल्हा परिषदेवर वर्चस्वाचा प्रयत्न

Attractive attempts to indulge in Awal-Awade failed | आवळे-आवाडे दिलजमाईचा प्रयत्न निष्फळ

आवळे-आवाडे दिलजमाईचा प्रयत्न निष्फळ

Next

राजाराम पाटील --इचलकरंजी --जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला. माजी मंत्री जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे यांच्यात समन्वय साधण्यात यश आले नसले तरी खासदार राजू शेट्टी व आवाडे यांच्याबरोबर येथील कारंडे गटाने दिलजमाई केली आहे.
जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे दोघेही कॉँग्रेस पक्षातील नेते आणि दोघांचाही विधानसभा मतदारसंघ वडगाव व इचलकरंजी असा वेगवेगळा असला तरी राजकीय कुरघोड्यांमुळे दोघात ध्रुवीकरण झाले आहे. जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पश्चिमेकडील नेते आवाडेंचा द्वेष करतात आणि आवळेंची मात्र ‘त्या’ नेत्यांबरोबर जवळीक असते. त्यातून समज-गैरसमजातून दोघांतील दरी वाढत गेली. विधानसभेच्या निवडणुकीत दोघांनाही पराभव सहन करावा लागला. त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या खापर परस्परांवर फोडले गेले.
सध्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा कॉँग्रेसकडून डावलले जाणार, याची पूर्वकल्पना घेऊनच आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीची नोंदणी केली. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांत दोघांनाही असलेली परस्परांची गरज लक्षात घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राजू शेट्टी व आवाडे यांनी एकत्र येण्याचे ठरवले. शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत २२ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आवाडे गट १० जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवार उभा करीत आहे. त्यापैकी २० जि. प. सदस्य निवडून आले तरी जिल्हा परिषदेमध्ये शेट्टी-आवाडे यांना वर्चस्व साधता येईल, असा त्यामागचा हेतू आहे.
अशा पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यात आवाडे व आवळे यांच्यामध्ये युती व्हावी, यासाठी खासदार शेट्टी यांनी प्रयत्न केले. या तिघांची बैठकसुद्धा झाली. रात्री प्रदीर्घ काळ चाललेल्या बैठकीत भादोले, रुकडी व हातकणंगले या तीन जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आवळेंनी उमेदवार उभे करावेत. उर्वरित रेंदाळ, हुपरी व पट्टणकोडोली या मतदारसंघांत आवाडेंनी उमेदवार उभे करावेत, असा तोडगा समोर आला. या मुद्द्यांवर सुमारे तासभर चर्चा होऊनसुद्धा बोलणी फिसकटली. अखेर कोरोची व कबनूर या दोन मतदारसंघात आवाडे व शेट्टी यांनी एकत्रित काम करण्याचे ठरवले. त्यातील कोरोचीमधील पंचायत समितीचा एक मतदारसंघ आवाडे गटाकडे, तर दुसरा मतदारसंघ कारंडे गटाला देण्यात आला.
हातकणंगले तालुक्यातील आवाडे व शेट्टी यांच्यातील युतीच्या बदल्यात आवाडे गटाने शेट्टी यांना शिरोळ तालुक्यात मदतीचा हात देण्याचे निश्चित करण्यात आले.


नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे पडसाद
इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीमध्ये जयवंतराव आवळे यांनी त्यांचे पुत्र संजय आवळे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, या उमेदवारीला आवाडे गटाकडून जोरदार विरोध झाला. ही घटना ताजी असल्यामुळे याचेच उट्टे आता आवळे गटाकडून काढले जात असल्याची चर्चा येथील राजकीय क्षेत्रात आहे.
बारा वर्षांनंतर आवाडे समर्थकांना संधी
रेंदाळ या जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघातील रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी, चंदूर, यळगूड अशी गावे जवाहर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. याठिकाणी आवाडे गटाचे अनेक कार्यकर्ते आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या फेररचनेनंतर ही गावे वडगाव मतदारसंघामध्ये समाविष्ट झाली. त्यामुळे सुमारे बारा वर्षांनंतर या गावातील आवाडे समर्थकांना आवाडेंच्या घरातील उमेदवाराच्या प्रचाराची संधी मिळाली आहे. त्याचाही फायदा राहुल आवाडे यांना होईल, अशीही चर्चा आहे.

Web Title: Attractive attempts to indulge in Awal-Awade failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.