एचसीएल कंपनीचे आॅडीट करावे : जयश्री चव्हाण

By admin | Published: June 22, 2017 05:21 PM2017-06-22T17:21:32+5:302017-06-22T17:21:32+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेत घोटाळा होत असल्याचा आरोप

Audit of HCL Company: Jayashree Chavan | एचसीएल कंपनीचे आॅडीट करावे : जयश्री चव्हाण

एचसीएल कंपनीचे आॅडीट करावे : जयश्री चव्हाण

Next



आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २२ : महानगरपालिका प्रशासनाने रोकड स्वीकारण्याचे तसेच विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी ठेका दिलेल्या एचसीएल कंपनीचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. संबंधित कंपनीकडून आर्थिक घोटाळा होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. याबाबत त्यांनी एक पुरावाही पत्रकारांना दिला.

ठेका दिल्यापासून एचसीएल कंपनीचा गैरकारभार सुरु आहे. कराराप्रमाणे जादा सुविधा द्यायच्या होत्या, त्या त्यांनी दिलेल्या नाहीत. कंपनीच्या कारभारावर महापालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्याचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे घोटाळा घडत असल्याचा दावा जयश्री चव्हाण यांनी केला आहे.

राजारामपुरीतील शारदा हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या विजय सदाशिव इंदुलकर व जीवन सदाशिव इंदुलकर यांनी गतवर्षी सन २०१६-१७ सालाचा ६३७९ रुपयांचा घरफाळा दि. ८ आॅगष्ट रोजी एचसीएल कंपनीच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन भरला. मुदतीत पैसे भरले म्हणून २२८ रुपयांची सवलतही देण्यात आली. असे असूनही त्यांना सन २०१७-१८ सालचा १० हजार ९७२ रुपयांचा घरफाळा मागणीची पावती देण्यात आली. त्यावेळी इंदुलकर यांनी चौकशी केली असता तुम्ही गेल्यावर्षी घरफाळा भरला नसल्याचे उत्तर देण्यात आले.

पावती असूनही घरफाळा भरला नाही असे उत्तर आल्यानंतर इंदूलकर यांनी नगरसेविका चव्हाण व सचिन चव्हाण यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. चव्हाण यांनी एचसीएल कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता घरफाळा भरल्याची नोंद आढळली तर महापालिकेच्या दफ्तरी तो न भरल्याची नोंद आढळली.

जर इंदुलकरांनी घरफाळा भरला असेल तर ती रक्कम त्याच दिवशी किंवा दोन तीन दिवसांनी महापालिकेच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होती. ती झालेली नाही. शिवाय नवीन बील देताना व्याजाच्या आकारणीतही चुका झाल्या आहेत.
थकबाकीच्या रक्कमेवर ४५०० रुपये व्याज आकारले आहे. त्यामुळे यात घोटाळा घडल्याची शंका चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. अशी अनेक प्रकार घडलेले असू शकतात, त्यामुळे एकूणच या कंपनीचे लेखापरीक्षण करण्याची आवशकता असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी एचसीएलच्या कारभाराची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी वसुल केलेल्या परंतु मनपाकडे न भरलेले पैसे व्याजासह वसुल करावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

Web Title: Audit of HCL Company: Jayashree Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.