पालिकेच्या पाणी योजनेचे आॅडिट
By admin | Published: November 5, 2015 09:48 PM2015-11-05T21:48:07+5:302015-11-06T00:11:09+5:30
प्रशांत रसाळ : सार्वजनिकऐवजी ग्रुप कनेक्शन देणार
इचलकरंजी : नगरपालिकेच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे वॉटर आॅडिट करून घेण्यात येणार असून, सुमारे दोन हजार नवीन नळ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बहुतांशी ठिकाणी असलेले सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करून त्याऐवजी ग्रुप कनेक्शन देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्याधिकारी डॉ. रसाळ म्हणाले, शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजनांतून सुमारे ४४ टक्के पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. ही गळती किमान वीस टक्क्यांवर आणली जाणार आहे. तसेच नळ पुरवठा योजनेकडील उत्पन्नही वाढविण्यात येणार आहे. याशिवाय ज्याठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन असेल, त्यांच्यासाठी अभय योजना जाहीर करून सदरचे कनेक्शन अधिकृत करून घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत नळ कनेक्शन अधिकृत करून घेतली नाहीत, तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
वाढत्या लोकसंख्येबरोबर शहराची पर्यावरणविषयक होणारी हानी व त्यावरील उपाययोजना याचाही अहवाल तयार करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात साफसफाई व कचरा उठाव योजनेंतर्गत संबंधित ठेकेदाराकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर इथून पुढे कडक नजर राहील. याशिवाय बांधकाम विभागाकडील बांधकामाच्या दर्जाबाबत त्रयस्थ संस्थेमार्फत अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची बिले दिली जातील. बांधकाम परवान्याची पद्धती सुलभ करण्यात येईल. तसेच बांधकामाबाबत दिल्या जाणाऱ्या परवान्याची तपासणी बांधकाम सुरू असतानाच केली जाईल. परिणामी बेकायदेशीर बांधकामाला आळा बसेल.
नगरपालिकेच्या हद्दीतील प्रमुख असलेले चौदा रस्ते शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत होण्यासाठी ३२ कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी सुमारे २५ कोटी रुपयांची कामे मंजूर
झाली आहेत, असे स्पष्ट करून मुख्याधिकारी म्हणाले, पालिकेतील कामकाजाबाबत पारदर्शकता यावी. तसेच नागरिकांची कामे गतीने व्हावीत, यासाठी प्रत्येक विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर मुख्याधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष राहील, असे सांगून ते म्हणाले, नागरिकांना भेटण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची निश्चितपणे उपलब्धता व्हावी म्हणून दररोज सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना लोकांनी भेटावे. तसेच दुपारी ४ ते ६ या वेळेत त्यांनी आपणास भेटावे, असेही मुख्याधिकाऱ्यांनी शेवटी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नगररचना अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
पालिकेकडील नगररचना अधिकारी बबन खोत यांना शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दिली. डॉ. रसाळ हे इचलकरंजी पालिकेमध्ये रूजू होऊन सुमारे दोन महिने झाले.
या कालावधीमध्ये खोत हे पालिकेस कोणत्याही प्रकारची माहिती न देता यापूर्वी दोन वेळा गैरहजर राहिले होते. तेव्हा त्यांना फक्त तोंडी समज देण्यात आली होती. मात्र, खोत मंगळवारी अनुपस्थित राहिले. म्हणून आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत खुलासा करावा, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे डॉ. रसाळ यांनी स्पष्ट केले.