‘भोगावती’ निवडणुकीबाबत प्राधिकरणाला फटकारले

By admin | Published: January 14, 2017 12:53 AM2017-01-14T00:53:15+5:302017-01-14T00:53:15+5:30

उच्च न्यायालय : सोमवारी म्हणणे सादर करण्याचे आदेश

The Authority reprimanded the 'Bhogavati' election | ‘भोगावती’ निवडणुकीबाबत प्राधिकरणाला फटकारले

‘भोगावती’ निवडणुकीबाबत प्राधिकरणाला फटकारले

Next



कोल्हापूर / भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी सहकार प्राधिकरणासह साखर सहसंचालकांना चांगलेच फटकारले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ‘अ’ वर्ग संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी (दि. १६) म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
‘भोगावती’ची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडली होती. जिल्हा परिषदेच्या तोंडावर निवडणूक घेऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील होते; पण सहकार प्राधिकरणाने गुरुवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. जिल्हा परिषद व कारखान्याचा प्रचार एकाच वेळी येणार असल्याने ते करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदारांना अडचणीचे ठरणार आहे. या विरोधात कारखान्याचे माजी संचालक विश्वनाथ पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सुभाष पाटील-सिरसेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब कारंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्या. खेमकर व न्या. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सहकार कलम ७३ (क, क) नुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरू असताना ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक घेता येत नाही. मग सहकार प्राधिकरणाने कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश न्यायालयाने सहकार विभाग, सहकार प्राधिकरण व प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत. अ‍ॅड. संजय पवार व अ‍ॅड. हर्षवर्धन भावके यांनी न्यायालयात बाजू मांडत निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली.

‘शाहू’च्या निवडणुकीची आठवण!
‘शाहू’- कागलच्या २००० च्या निवडणुकीत वाढीव सभासदांवर हरकत घेत हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी मतदानाच्या अगोदर एक दिवस न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. या आठवणीला शुक्रवारी भोगावती परिसरात उजाळा दिला जात होता.

४१ उमेदवारांचे अर्ज
निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे मंगळवारी (दि. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी ४१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये महिला, ओ.बी.सी., भटक्या विमुक्त गटाचा समावेश आहे.

Web Title: The Authority reprimanded the 'Bhogavati' election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.