‘ताराराणी’च्या चिन्हाचा निर्णय अधिकाऱ्यांकडे
By Admin | Published: October 8, 2015 12:14 AM2015-10-08T00:14:02+5:302015-10-08T00:32:43+5:30
उच्च न्यायालयात सुनावणी : आयोगास निर्देश करण्यास नकार
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांत ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना मुक्त चिन्हांपैकी एकच चिन्ह मिळावे, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगास देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. न्यायाधीश अभय ओक यांच्यासमोर ही सुनावणी झाली. तुम्ही एक चिन्ह मिळण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडी एकत्र आली आहे. एकूण ८१ पैकी निम्म्या-निम्म्या जागा ते लढविणार आहेत. भाजपचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील; परंतु ‘ताराराणी’च्या उमेदवारांना प्रभागनिहाय वेगळे चिन्ह मिळाल्यास प्रचार करण्यास अडचणी येतील. त्यामुळे आघाडीच्या सर्वच उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे, असा अर्ज आघाडीच्यावतीने सुनील मोदी यांनी १२ आॅगस्टला राज्य निवडणूक आयोगाकडे केला. आयोगाने त्यास ८ सप्टेंबरच्या पत्रान्वये (रानिआ/रापनों-२०१५/संक्र १३२ / का ११) लेखी उत्तर दिले. नोंदणीकृत राजकीय पक्षास निवडणुकीस उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना एकच समान मुक्त चिन्ह देण्याची तरतूद ३१ मार्च २००९ च्या महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश २००९ मध्ये नाही. सबब कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना समान मुक्त चिन्ह देण्याची आपली विनंती मान्य करता येत नाही, असे निवडणूक आयोगाच्या सांख्यिकी अधिकारी मनीषा माने यांनी मोदी यांना पत्रान्वये कळविले. या पत्रास स्थगिती देऊन आघाडीस एकच समान चिन्ह मिळावे यासाठी ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याची बुधवारी सुनावणी झाली परंतु, आयोगाने त्यावर कोणताही निर्णय दिला नाही. असे एक चिन्ह मिळण्याबाबत तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा, असे याचिकाकर्त्यास सुचविले आहे.
एकच चिन्ह मिळणार : मोदी
ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना एकच चिन्ह मिळेल. फक्त त्याचा निर्णय चिन्ह वाटपादिवशी १७ आॅक्टोबरला होईल, असा दावा सुनील मोदी यांनी केला. न्यायालयाने हा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे सुचविले असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.
आता कसोटी निवडणूक अधिकाऱ्यांची..
राज्य निवडणूक आयोग एक समान चिन्ह देण्यास तयार नाही. न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या आदेशास स्थगिती दिलेली नाही. त्यांनी तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे जावा, असे सांगून निवडणूक कायद्यांतर्गत तरतुदीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असताना निवडणूक अधिकारी काय निर्णय देणार यासंबंधीची उत्सुकता लागली आहे. महापालिका निवडणुकीचे आयुक्त हे निवडणूक अधिकारी आहेत. त्यामुळे ते याबाबत आता कोणता निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
कायद्यानुसार निर्णय : आयुक्त
उच्च न्यायालयाच्या सूचनेसंदर्भात अथवा आयोगाकडूनही आमच्याकडे याबाबत कोणतेही आदेश अथवा सूचना प्राप्त झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या कायदेशीर तरतुदीनुसार जे ग्राह्य असेल, त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पतंग की कपबशी..
ताराराणी आघाडीने एकच चिन्ह मिळावे यासाठी आग्रह धरला असला तरी ते ‘पतंग’ की ‘कपबशी’ याबद्दल मात्र संभ्रम आहे. आघाडीच्यावतीने बुधवारी प्रकाश नाईकनवरे यांच्या अर्जात ‘पतंगा’ला पहिली पसंती दिली आहे. कपबशी दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक हे शरद पवार यांच्याविरोधात बंड करून लोकसभेला ‘कपबशी’ चिन्ह घेऊन मैदानात उतरले व विजयी झाले. यामुळे बंडखोरांचे हे यशस्वी चिन्ह असल्याने ‘कपबशी’ला प्राधान्य आहे.