स्वयंशिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:32 PM2019-06-03T23:32:38+5:302019-06-03T23:32:42+5:30
भारत चव्हाण गेल्या १०-१२ वर्षांत ‘मोबाईल’ क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली; त्यामुळे जग अगदी जवळ आले. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून माणसांचे ...
भारत चव्हाण
गेल्या १०-१२ वर्षांत ‘मोबाईल’ क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली; त्यामुळे जग अगदी जवळ आले. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून माणसांचे एकमेकांशी संभाषण अधिक सुलभ झाले. त्याच काळात व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखी समाजमाध्यमे विकसित झाली. हजारो मैलांवर असणारी माणसे एकमेकांच्या जवळ आहेत, असाच भास व्हायला लागला. केव्हाही, कुठूनही, कुठेही असताना पलीकडील व्यक्तीशी एकमेकांना पाहत बोलू शकता, इतक ी प्रगती झाली आहे. समाजमाध्यमांचा प्रसार व प्रचार झपाट्याने झाला असल्यामुळे आज-काल ज्याच्या हातात स्मार्टफोन नाही, तो निरक्षर समजला जाऊ लागला आहे. आतापर्यंत जी मंडळी स्मार्टफोनपासून लांब होती, तीदेखील उत्सुकतेपोटी फोन वापरू लागली आहेत. ७० वर्षांचे वृद्ध जसे स्मार्टफोनकडे आकर्षित झाले आहेत, तसेच दोन-तीन वर्षांची मुलेही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली आहेत. स्मार्टफोनवर खेळ खेळण्यात ही मुलं अधिक पटाईत आहेत. मोबाईलची क्रांती आणखी कुठंपर्यंत जाईल, हे येणारा काळच सांगू शकेल. एकीकडे एक पिढी माहितीच्या खजिन्यापर्यंत पोहोचली असताना, दुसरीकडे अनेक सुज्ञ नागरिक मात्र हीच पिढी स्मार्टफोनमुळे बिघडत चाललीय, अशा भीतीवजा सार्वत्रिक तक्रार करू लागलेत.
कोणत्याही तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही असतात. तंत्रज्ञानात गुण-दोष असणारच. त्यातलं चांगलं काय घ्यायचं हे प्रत्येकानं ठरवायचं असतं. केवळ समाजमाध्यमांच्या तंत्रज्ञानामुळेच तरुण पिढी बिघडणार आहे, अशी तक्रार करणे अयोग्य आहे. समाजात अशा अनेक वस्तू आहेत की, ज्यामुळेसुद्धा तरुण पिढी बिघडण्याची शक्यता असते. उदा. देशी-विदेशी मद्य, चरस, गांजा, तंबाखू, गुटखा, सिगारेट यांसारख्या विनाश करणाºया वस्तू बाजारात खुलेआम उपलब्ध होत आहेत. एकीकडे दारूबंदी, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालायची आणि दुसरीकडे त्यांना विक्रीची परवानगी द्यायची, हे सरकारी धोरण अन्यायकारकच आहे. या वस्तूंमुळे सरकारला कोट्यवधींचा कर मिळतो, तर स्मार्टफोनमुळे खासगी कंपन्यांना कोट्यवधींचा नफा मिळतो; त्यामुळे दोन्हींच्या वापरावर बंधन घालण्याच्या कोणी फंदात पडणार नाही. फक्त आपणच त्याच्या आहारी किती जायचे, हे ठरविले पाहिजे.
समाजमाध्यमांचा वापर कसा करून घ्यायचा, हे आपल्याच हातात आहे. त्याचा वाईट वापर टाळून, तो वापर सकारात्मक, परिवर्तनाच्या, अभ्यासाच्या, तसेच चांगल्या गोष्टींच्या अनुकरण करण्याच्या दृष्टीने करून घेतल्यास त्याचा उपयोग अधिक परिणामकारक होईल. चांगल्या अर्थाने तो करूनही घेता येण्यासारखा आहे. समाजमाध्यमांवरील तीन व्हिडीओ क्लिप मला खूप आवडल्या. त्यातून बरंच काही शिकता येण्यासारखं आणि त्याप्रमाणे आपणही वागण्यासारखं आहे. पहिली व्हिडीओ क्लिप स्वच्छतेच्या बाबतीतील आहे. एक लहान मुलगा आपल्या आईसोबत रस्त्यावर उभा आहे. त्याच्या हातात एक छोटी पिशवी आहे. तिकडून एक ट्रक येतो. ट्रक फूटपाथला लागून उभा राहिल्यानंतर हा लहान मुलगा हातातील पिशवी त्या ट्रकमधील कर्मचाºयाकडे देतो. त्या पिशवीमध्ये कचरा असतो. एक लहान मुलगा कचºयाचा ट्रक येईपर्यंत वाट पाहत थांबतो, त्यादरम्यान तो कुठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत नाही. सुंदर अशी ही अनुकरणीय क्लिप आहे. दुसरी क्लिप वाहतुकीच्या संदर्भातील आहे. सकाळच्या वेळी वाहतूक फारशी नसलेल्या वेळी एका चौकात एक कार सिग्नलला थांबलेली आहे. चारही रस्ते मोकळे आहेत. सिग्नलजवळ एकही दुसरे वाहन नाही. कारचालक अधिक वेगाने चौकातून निघून जाऊ शकेल अशी परिस्थिती असतानाही रेड सिग्नल असल्यामुळे तो थांबलेला आहे. सिग्नल आपल्या सोईसाठी आहेत, त्यांचे तंतोतंत पालन करणे आपले कर्तव्य असल्याची त्याची भावना इतरांना बरेच काही शिकवून जाते. तिसरी क्लिपसुद्धा वाहतुकीसंदर्भातीलच होती. दोन महिला रस्त्याच्या एका बाजूकडून दुसºया बाजूला बदके घेऊन चालल्या आहेत. समोरचे चित्र पाहिल्यानंतर लगेच रस्त्यावरील वाहतूक थांबते. हॉर्न न वाजविता वाहनधारक रस्त्यातील बदके जाण्याची शांतपणे वाट पाहत बसले आहेत, अशी ती क्लिप आहे. सार्वजनिक ठिकाणी कार चालवितानाचा चालकाचा संयम आणि त्यांच्यातील स्वयंशिस्त या क्लिपमधून पाहायला मिळते. या तिन्ही क्लिप अर्थातच परदेशातील आहेत, यात शंकाच नाही. आपल्या देशात, राज्यात तसेच शहरात असे शिस्तबद्ध नियम, कायदे पाळण्याच्या सवयी लोकांना कधी लागतील काही सांगता यायचं नाही. मात्र, या क्लिप्स पाहिल्यानंतर प्रत्येकाने त्यांचे अनुकरण करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. सुधारणेची, बदलाची सुरुवात आपल्या स्वत:पासून केली तरच लोक बदलतील, समाज बदलेल, अशी अपेक्षा आहे.