Kolhapur News: दफन केलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे शवविच्छेदन, पत्नीकडून घातपाताचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 03:40 PM2023-05-03T15:40:06+5:302023-05-03T15:40:28+5:30
अहवालानंतर मृत्यूचे गूढ उकलणार
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील अमीर बालेचाँद नदाफ (वय ३०) या तरुणाचा तीन दिवसांपूर्वी कोगनोळी (ता. मिरज) येथे मृत्यू झाला होता. आकस्मिक मृत्यू झाल्याचे समजून नातेवाइकांनी हेरवाड येथील दफनभूमीत दफन केले होते. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत संशय आल्याने पत्नी फातिमा अमीर नदाफ यांनी कवठेमहांकाळ (ता. मिरज) पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मंगळवारी दुपारी दफन केलेला मृतदेह काढून शवविच्छेदन केले. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचे गूढ उकलणार आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमीर हा दोन महिन्यांपूर्वी कोगनोळी येथे आत्याकडे राहण्यास गेला होता. शनिवारी (दि. ३०) त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह त्याच्या मूळगावी हेरवाड येथे आणून आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगून घाईगडबडीत तो दफन करण्यात आला होता. मात्र, अमीरचा मृत्यू आकस्मिक नसून घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांना आल्याने सोमवारी प्रथम कुरुंदवाड पोलिस ठाणे व त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून खातरजमा करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे यांच्या पथकाने कुरुंदवाड पोलिसांच्या मदतीने नायब तहसीलदार संजय पवार यांच्या साक्षीने दफन करण्यात आलेला अमीरचा मृतदेह काढून जागेवरच शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी जाधव, आरोग्य अधिकारी प्रशांत माने, अभिजित भोसले यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे गूढ उकलणार आहे. दरम्यान, आत्येभाऊ आणि अमीर यांच्यामध्ये वादावादी होऊन मारामारी झाली होती. या मारामारीत त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
कुटुंबीयांना धक्का
अमीरच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. शेतीवाडी नसल्याने गवंडी काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, त्याचाच मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.