रिक्षाचालकांची कोरोना मदत ॲपअभावी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:23+5:302021-05-20T04:26:23+5:30
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाखो परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोना काळात मदतीचा हात म्हणून प्रत्येकी १५०० रुपये खात्यात ...
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाखो परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोना काळात मदतीचा हात म्हणून प्रत्येकी १५०० रुपये खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले; परंतु प्रत्यक्षात मदत वाटपासाठीचे ॲपच अजून तयार झाले नसल्याने ही मदत हवेतच राहिली आहे. आता शिवसेनेचेच जिल्हा प्रमुख विजय देवणे व शिवसेनाप्रणीत रिक्षा संघटना थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेनंतर रिक्षाचालकांना मदत करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने रिक्षाचालकांची माहिती असलेले ॲप तयार करण्यास सुरुवात केली आहे. या ॲपवर रिक्षाचालकांना आधार नंबर, बॅच, वाहन चालविण्याचा परवाना व बँक खात्याची माहिती भरता येणार आहे. थेट लाभार्थ्याच्या हातात मदत जावी असे प्रयत्न आहेत. मात्र, त्यासाठीचे ॲप अद्याप तयारच झालेले नाही. ते कधी तयार होईल हे परिवहन कार्यालयाकडून राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना समजत नाही. त्यामुळे ही मदत ठप्प आहे. निधी मंजूर आहे; परंतु ॲप तयार नसल्याने त्याचे वाटप करता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात १५ हजार रिक्षाचालक आहेत. विविध रिक्षा संघटना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मदतीबद्दल वारंवार विचारणा करीत आहेत. परिवहन मंत्री परब यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. त्यामुळे लवकरच रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील. अशी आशा रिक्षाचालकांकडून व्यक्त होत आहे.
कोट
मुख्यमंत्र्यांनी रिक्षाचालकांकरिता जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत तातडीने त्यांना मिळावी यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ॲप तयार नसल्यामुळे मदत देण्यात अडचणी आल्या आहेत.
विजय देवणे,
जिल्हाप्रमुख, शिवसेना