वाहन उद्योगास २०१६ नंतर सुगीचे दिवस
By admin | Published: December 25, 2014 11:47 PM2014-12-25T23:47:53+5:302014-12-26T00:03:54+5:30
राजू केटकाळे : टोयोटा इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होण्याचा कोल्हापूरला मान
कोल्हापूर : सध्या मंदीतून वाटचाल करीत असलेल्या वाहन उद्योगास दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१६ नंतर पुन्हा ऊर्जितावस्था येईल. या काळात मानवी सुरक्षेच्या मानांकनाबाबत देशातील वाहने प्रगत देशाच्या जवळपास जातील. २०१९ पर्यंत जगभरातील प्रगत देशांप्रमाणे वाहन सुरक्षेची मानके देशातील सर्वच वाहनांमध्ये असतील, अशी माहिती कोल्हापुरातील कबनूरचे सुपुत्र टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू केटकाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
कबनूर येथे दहावीपर्यंत शालेय शिक्षण, त्यानंतर कोल्हापुरात महाविद्यालयीन, तर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या राजू केटकाळे यांनी जगातील वाहन उद्योगात अग्रभागी असलेल्या टोयोटाच्या देशातील पहिल्या पाच अधिकारी असलेल्या पदापर्यंत मजल मारली. जगभरातील ६० टक्के मोटार गाड्यांचे डिझाईन भारतीय तंत्रज्ञांकडून होते. मराठी पर्यायाने भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे. जिद्दीने काम करण्याच्या जोरावर अशक्य नाही. ग्रामीण मुलांनी तंत्रज्ञ विषयात पुढे यावे, जग त्यांचेच आहे, अशा शब्दांत राजू केटकाळे यांनी तरुणांना आवाहन केले.
केटकाळे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी तंत्रज्ञात कमी पडल्याने भारतीय वाहन उद्योग जगाच्या तुलनेत कमी पडत होता. वाहन उद्योगाला देशात मोठी संधी आहे. मोटार वापरात अमेरिका व जपानमध्ये दर हजारी ६०० नागरिक, तर थायलंडमध्ये ७० आहेत. भारतात हेच प्रमाण १९ ते २५ च्या दरम्यान आहे.
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा वाहन उद्योग भविष्यात उचल खाईल. मोटार गाडीचा एक युनिट तब्बल ३० हजार रोजगार उपलब्ध करतो. देशात टोयोटाची अशी दोन युनिट आहेत. तिसरे युनिट लवकरच सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इंडिया’ ही योजना वाहनांसह सर्वच उद्योगांना नव्याने उभारणीसाठी ऊर्जा देणारी आहे. याचे परिणाम येत्या दोन वर्षांत दिसून येतील. (प्रतिनिधी)
वर्षाला एक लाख मोटार गाड्यांचे उत्पादन, १४०० कोटींची वार्षिक उलाढाल अन् आठ हजारांपेक्षा उच्च तंत्रज्ञयुक्त कर्मचाऱ्यांची धुरा सांभाळणारे केटकाळे यांनी वाहन उद्योगाबाबत भवितव्य सांगितले.