टपाल खात्याचा इतिहास साठवणारा अवलिया
By admin | Published: October 9, 2015 01:11 AM2015-10-09T01:11:04+5:302015-10-09T01:11:32+5:30
मात्र, गेली ४० वर्षे पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद जोपासत भाटकर यांनी जणू भारतीय टपाल खात्याच्या कार्याचा इतिहासच जपून ठेवला आहे.
शोभना कांबळे -रत्नागिरी छंद माणसाच्या जीवनात चैतन्य निर्माण करतात. त्यामुळे व्यक्ती वाचन, लेखन, संगीत, नृत्य, विविध कला जोपासत असते आणि यातून वेगळा आनंद मिळविते. पण रत्नागिरीचे ७६ वर्षीय टपाल तिकीट संग्राहक रमेश भाटकर यांनी याहीपेक्षा वेगळा असा छंद जोपासला आहे. आज दळणवळणाची साधने बदलली आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे सामान्य लोकांशी स्नेह असलेल्या पोस्टाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. मात्र, गेली ४० वर्षे पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद जोपासत भाटकर यांनी जणू भारतीय टपाल खात्याच्या कार्याचा इतिहासच जपून ठेवला आहे.
रत्नागिरीच्या मांडवी येथील रमेश भाटकर यांनी पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद १९५६पासून जोपासला आहे. शालेय जीवनात तिकिटांबरोबरच नाणी जमवण्याचा छंद पुढे सहकारी मित्रांच्या सहकार्याने कायम ठेवला. मुंबईत रिझर्व्ह बँकेत नोकरीला असतानाही त्यांच्या या छंदात खंड पडला नाही. त्यामुळे १९९८ साली निवृत्त झाल्यानंतर ते मूळ गावी रत्नागिरीत आले. ते ‘द फिलाटेलीक सोसायटी आॅफ इंडिया’चे सदस्य असल्याने त्यांच्या या संग्रहात वाढ होत आहे.
अनेक लोक हौस म्हणून पोस्टाची तिकिटे जमवतात. त्यांना ‘फिलेटेलिक’ अर्थात तिकीट संग्राहक असे म्हणतात. मात्र, त्यांना त्यांचा इतिहास माहीत नसतो. परंतु रमेश भाटकर यांच्याकडे या तिकिटांचा इतिहास आहे. ब्रिटिश काळात दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून डलहौसी याने १८५४मध्ये भारतात टपाल कार्यालये सुरू केली. आतापर्यंतच्या या १६० वर्षांच्या दीर्घ काळात पोस्टाने विविध सेवांबरोबरच या कालावधीत हजारो तिकिटे काढली. सर्वसामान्य तिकिटे ही पुन्हा पुन्हा गरजेनुसार काढली जातात, तर विशेष तिकिटे ही विशिष्ट प्रसंगी, विशिष्ट दिवशी विविध विषयावर पण एकदाच काढली जातात.
पोस्टाने १८४० साली पहिले विशेष तिकीट काढले ते इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे. तेव्हापासून सातत्याने पोस्टाची तिकिटे काढली जात आहेत. ही सर्व तिकिटे आणि आणि त्यांचे प्रथम दिन आवरण भाटकर यांच्या संग्रहात आहे. त्यानंतर या तिकिटाला १५० वर्षे झाल्यानंतर भारतीय टपाल खात्याने ६ मे १९९० साली काढलेले तिकिटही भाटकर यांच्याकडे आहे. याचबरोबर डॉ. के. ब. हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, संत तुकाराम, स्वामी स्वरुपानंद, बकिमचंद्र चॅटर्जी, शिवाजी महाराज, सी. डी. देशमुख, जिजाबाई, बॅ. नाथ पै, खुदीराम बोस, ना. ग. गोरे, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद, बाळासाहेब खेर अशा हजारो महनीय व्यक्तिंची तिकिटे भाटकर यांच्या संग्रही आहेत. त्याचबरोबर विविध भारतीय वाद्ये, वाहने, दागिने, प्राणी, पक्षी यांची तिकिटेही त्यांच्याकडे आहेत.
त्यांचा हा तिकीट संग्रह बॉलिवूड, बालदिन, स्वातंत्र्य योद्धे आणि संरक्षण दल अशा चार विभागात केलेला आहे. अनेक प्रदर्शनात त्यांनी ही तिकिटे ठेवली होती. रत्नागिरीत २००५ साली झालेल्या रत्नपेक्स या तीन दिवसांच्या प्रदर्शनात त्यांनी हा संग्रह ठेवला होता. या प्रदर्शनाला मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरांतील संग्राहक आले होते. मात्र, या साऱ्यांमधून भाटकर यांच्या संग्रहाला पारितोषिक मिळाले होते.
जगातील सर्वाधिक टपाल कार्यालये भारतात आहेत. या कार्यालयाला लाखो तिकिटांची गरज भासते. त्यामुळे जोपर्यंत पत्र लिहिली जाणार आहेत किंवा कोणतेही कागदपत्र पोस्टाने पाठविले जाणार आहेत, तोपर्यंत पोस्टाला अशा तिकिटांची गरज भासणार आहे. भारतात दरवर्षी ७० ते ८० तिकिटे प्रसिद्ध केली जातात. भाटकर यांच्याकडे अगदी सुरुवातीपासून म्हणजेच १८४०सालापासून आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या टपाल तिकिटांचा संग्रह आहे. हा संग्रह पाहताना वेळ कधी निघून जातो, हेच कळत नाही. पोस्टाच्या तिकिटांबरोबरच भाटकर यांच्याकडे नाणी व नोटा यांचाही संग्रह आहे.
गेली ४० वर्षे सेवानिवृत्तीनंतर रमेश भाटकर यांचा हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. या संग्रहातून आपल्याला खूप समाधान मिळत आहे. तसेच निरनिराळ्या प्रदर्शनातून सहभाग घेऊन लोकांपुढे अनेक महनीय व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जागवल्या जातात, हे समाधान मोठं असल्याचे मत संग्राहक रमेश भाटकर व्यक्त करतात.
1महाविद्यालयीन दशेत असलेले रमेश भाटकर २३ जुलै १९५६ रोजी सहजच फिरत रत्नागिरीतील टिळक आळी येथे आले. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाजवळ टपाल खात्याने टिळकांवर काढलेल्या तिकिटाचा अनावरण सोहळा सुरू होता. या सोहळ््याच्या ठिकाणी सहजच ते गेले. आणि भाटकर यांनीही सहज गंमत म्हणून दोन आण्याचे त्या दिवसाचे शिक्का मारलेले पाकीट घेतले. प्रथम दिवस आवरण असलेले ते पहिले तिकीट त्यांच्या संग्रहात आले. मुुंबईला नोकरीला लागल्यानंतर त्यांच्या या छंदातून आतापर्यंत दोन हजारांच्या आसपास तिकिटे जमा झाली आहेत.
2पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्यावरही पोस्टाने तिकीट काढले होते. त्याचे अनावरण २० डिसेंबर २००३ साली पावस येथे झाले होते. याचेही प्रथम दिवस आवरण भाटकर यांच्याकडे आहे.
3पोस्टाद्वारे काढण्यात आलेली तिकिटे बहुतांश दिवंगत नेते, महनीय व्यक्ती यांच्यावर काढण्यात आलेली आहेत. अपवाद ठरले ते मदर तेरेसा, विश्वेश्वरय्या आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.
4आतापर्यंत पोस्टाने काढलेल्या तिकिटांमध्ये महात्मा गांधी यांच्या तिकिटांची संख्या सर्वाधिक असून, ५० पेक्षा अधिक देशात त्यांची पोस्टाची तिकिटे निघालेली आहेत. ही सर्व तिकिटेही भाटकर यांच्या खजिन्यामध्ये जमा आहेत.
5 अलिकडे टपाल खातेही हायटेक झाले आहे. त्यामुळे नवनवीन योजना या कार्यालयातर्फे राबवल्या जात आहेत. त्यातील एक अत्याधुनिक योजना म्हणजे ‘माय स्टॅम्प’. मोठमोठ्या व्यक्तींची छबी आतापर्यंत पोस्टाच्या तिकिटावर पहायला मिळत होती. मात्र, आता त्यावर कुणाचीही छबी प्रसिद्ध होऊ शकते, ही संकल्पना घेऊन ‘माय स्टॅम्प’ ही योजना मार्च २०१४ मध्ये रत्नागिरीत सुरू झाली. रत्नागिरीतील प्रधान पोस्ट कार्यालयात रमेश भाटकर यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेतून स्वत: भाटकर यांनी यावेळी आपलेही तिकीट काढून घेतले. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०० जणांनी पोस्टाच्या या योजनेचा लाभ घेऊन आपली छबी असलेली तिकिटे काढून घेतली आहेत. या योजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.