‘अवनि’ने रोखला आडूर गावातील बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:25+5:302021-04-23T04:26:25+5:30
कोल्हापूर : बालविवाह रोखण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या निधीतून ‘अवनि’द्वारे संचलित जागर प्रकल्प सुरू झाल्याच्या महिनाभरातच गुरुवारी कोल्हापुरात पहिले यश ...
कोल्हापूर : बालविवाह रोखण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या निधीतून ‘अवनि’द्वारे संचलित जागर प्रकल्प सुरू झाल्याच्या महिनाभरातच गुरुवारी कोल्हापुरात पहिले यश आले. करवीर तालुक्यातील आडूर येथील १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात आला.
कोल्हापुरात लॉकडाऊनच्या काळात बालविवाहाचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढल्याची वस्तुस्थिती ‘अवनि’च्या अनुराधा भोसले यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावरून अमिताभ बच्चन यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कोल्हापूरसारखा प्रगत जिल्हा असतानाही इथे बालविवाह होतात आणि ते रोखताना योग्य यंत्रणेअभावी मर्यादा पडतात, याकडेही लक्ष वेधले होते. यावर बच्चन यांनी ११ लाख रुपये या कामासाठी देऊन काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार ‘अवनि’ने करवीर, शिरोळ, पन्हाळा या तालुक्यांसाठी ‘जागर’ हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेतला. महिन्याभरापूर्वीच याची सुरुवात झाली आणि गुरुवारी त्याला पहिले यशदेखील मिळाले.
आडूर गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची निनावी तक्रार बुधवारी रात्री ‘अवनि’कडे आली होती. त्याची शहानिशा झाल्यानंतर गुरुवारी सकाळी आठ वाजताच अनुराधा भोसले, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, प्रमोद पाटील, इम्रान शेख, कादंबरी भोसले हे गावात दाखल झाले. गावातील ग्राम बालसंरक्षण समितीला घेऊन ते लग्न होणाऱ्या घरात गेले. याची कुणकुण लागल्याने नवरी मुलीच्या आईने मुलगीला मामाच्या घरी पाठवले. पुन्हा लग्न लागेल म्हणून मुलीच्या आईकडून १८ वर्षापर्यंत लग्न करणार नाही असे बालकल्याण संकुलातील बाल न्यायालय कायद्यानुसार लिहून घेण्यात आले.
चौकट ०१
अवनिने कायमच बालविवाहाच्या विरोधी भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात अशा प्रकारे होणारे तीन ते चार विवाह रोखले आहेत. आता जागर प्रकल्पासारखे व्यासपीठ मिळाल्याने याला चांगले बळ येणार असून सुजाण नागरिकांनी अशा प्रकारचे कृत्य घडत असल्यास ‘अवनि’कडे तक्रार करावी.
- अनुराधा भोसले, उपाध्यक्ष, अवनि संस्था