कांद्याला तीन वर्षांतील उच्चांकी दर,गतवर्षीपेक्षा दरात सरासरी ४० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:53 AM2017-12-26T00:53:32+5:302017-12-26T00:55:45+5:30
राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा दर प्रतिकिलो ५५ रुपये असून, गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी दर राहिला आहे.
कांद्याचे उत्पादन सुरू झाले की दर घसरणे नवीन नाही. गेली तीन-चार वर्षे राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या दृष्टीने फारच अडचणीची गेली. बाजार समितीत कांदा घेऊन आल्यानंतर दर पडल्याने अनेकवेळा मोकळे गोणपाट घेऊनच घरी परतावे लागले. जरा दर वाढू लागले की कांद्याची आवक झाल्याने पुन्हा दर पडत होते. त्यामुळे कांदा उत्पादक कमालीचा त्रस्त झाला होता. नाशिक ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे; पण अहमदनगर, पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर बाजारपेठेकडेच आकर्षित होत असल्याने येथे कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते.
विशेष म्हणजे स्थानिकची एक पिशवीही आवक नसताना रोज १५ हजार पिशव्यांची आवक समितीत होते आणि तेवढी विक्रीही होते. गोवा, कोकणात येथून कांदा पाठविला जातो. त्यामुळे दर चांगला आणि रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा कल या मार्केटकडे अधिक आहे. दोन वर्षे झाले दरात घसरण सुरू आहे. मे २०१७ मध्ये तर घाऊक बाजारात प्रतिकिलो दीड रुपयाने कांदा विकावा लागल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले.
या कालावधीत साडेआठ रुपये उच्चांकी दर राहिला. जूनमध्ये दरात फारसा फरक पडला नाही. प्रतिकिलो २ ते ११ रुपये, तर जुलैमध्ये २ ते १७ रुपयांपर्यंत दर राहिला.
आॅगस्टपासून आवकही वाढू लागली आणि दरही वाढू लागले. आॅगस्ट महिन्यात १ लाख २२ हजार ७१० क्विंटलची आवक झाली आणि सरासरी ५ ते २९ रुपयांपर्यंत दर राहिले. आॅक्टोबरमध्ये आवक ७६ हजार क्विंटलवर आली आणि ४१ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये लाख क्विंटलपर्यंत आवक पोहोचली पण त्याबरोबर १० ते ५५ रुपयांपर्यंत दरही राहिला. डिसेंबरच्या २१ दिवसांत १ लाख ७० हजार क्विंटलची आवक होऊनही ५३ रुपयांपर्यंत दर आहे. गेल्या तीन वर्षांत सलग दोन महिने सरासरी ४० च्या वर दर राहिलेच नाहीत. यावेळेला मात्र गेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे.
आवक, दर पुढीलप्रमाणे
कालावधी आवक क्विंटल दर प्रतिकिलो
एप्रिल ते नोव्हेंबर २०१६ १० लाख ८ हजार १७ ५ ते १५
एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ ११ लाख १८ हजार ४९० १० ते ५५