‘सतेज कृषी’ प्रदर्शनात तासाभरात १२.३५ लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:21 PM2019-12-07T16:21:47+5:302019-12-07T16:24:27+5:30
तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी तासाभरात दोन ट्रॅक्टरच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ३५ हजारांची उलाढाल झाली. हे प्रदर्शन चार दिवस खुले राहणार असून, जातिवंत पशुपक्ष्यांसह शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
कोल्हापूर : तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी तासाभरात दोन ट्रॅक्टरच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ३५ हजारांची उलाढाल झाली. हे प्रदर्शन चार दिवस खुले राहणार असून, जातिवंत पशुपक्ष्यांसह शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सतेज कृषी प्रदर्शन २०१९’चे शुक्रवारी सायंकाळी महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, प्रतिमा सतेज पाटील, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, करवीरचे उपसभापती सागर पाटील, शशिकांत खोत, बाबासाहेब चौगुले, विनोद पाटील, धीरज पाटील, आदी उपस्थित होते.
प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून यंदा २५० हून अधिक पशू, पक्षी, कृषी अवजारे, खाद्यासह इतर वस्तूंचे स्टॉल सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यापासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. जर्मन कंपनीचा ‘कुबोटा’ कंपनीचा ‘४५-एचपी’च्या ट्रॅक्टरची सात लाख ७५ हजार रुपये, तर ‘२१ एचपी’च्या ट्रॅक्टरची चार लाख ६० हजार रुपयांनी विक्री झाली. पहिल्याच दिवशी तेही उद्घाटनानंतर तासाभरात तब्बल १२ लाख ३५ हजारांची विक्री झाली. ट्रॅक्टरच्या चाव्या आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आल्या.
प्रदर्शनातील आकर्षण
- पाच फूट लांब शिंगे असणारी ‘पंढरपुरी म्हैस’
- भली मोठी पिवळी सिमला मिरची
- तुरेवाला कोंबडा
- तीन लाखांची मुरा म्हैस
- २.४ फुट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण गाय
- नांदेडची गलबेल लाल गंधारी गाय
- गिनीपिग अश्व
- आधुनिक तंत्रज्ञानाची कृषियंत्रे
- तांदूळ महोत्सव : विविध वाणांचे खात्रीशीर तांदूळ