Kolhapur: ‘अविकाज सेक्युअर’ने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चुना, सहा जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:14 PM2023-10-25T12:14:20+5:302023-10-25T12:14:48+5:30

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता

Avikaj Secure defrauded investors of crores in kolhapur, case against six people | Kolhapur: ‘अविकाज सेक्युअर’ने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चुना, सहा जणांविरुद्ध गुन्हा

Kolhapur: ‘अविकाज सेक्युअर’ने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चुना, सहा जणांविरुद्ध गुन्हा

कोल्हापूर : अविकाज सेक्युअर इन्क्वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून २२ गुंतवणूकदारांना एक कोटी ९ लाख २७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संजय सदाशिव चव्हाण (वय ३८, रा. गिरगाव, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, कंपनीच्या संचालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा प्रकार मार्च २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात घडला.

कंपनीचा संचालक पिरगोंडा उर्फ विजय नरसगोंडा पाटील (रा. हातकणंगले) याच्यासह अश्विनी जयवंत तोडकर, अभिजित जयवंत तोडकर (दोघे रा. पोतदार हायस्कूलजवळ, सांगली), कृष्णा पोवार, कोमल चौगुले, किरण गोते (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरीत अविकाज सेक्युअर कंपनीचे कार्यालय आहे. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष संचालक पिरगोंडा पाटील याच्यासह अन्य संचालक आणि एजंटनी गुंतवणूकदारांना दाखवले. त्यानुसार गुंतवणूकदारांनी २५ मार्च २०२२ पासून कंपनीत पैसे भरण्यास सुरुवात केली. फिर्यादी चव्हाण यांच्यासह २२ जणांकडून कंपनीने एक कोटी ९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम भरून घेतली. या रकमेचे करार करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.

यातील काही जणांना परताव्याचा एक हप्ता दिला. त्यानंतर परतावे देणे थांबवले. वारंवार विचारणा करूनही परतावा आणि मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने कंपनीकडून फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. अखेर चव्हाण यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता

अविकाज कंपनीचा संचालक हातकणंगले येथील असून, त्याचे अन्य साथीदार सांगली, जयसिंगपूर आणि शिरोळ येथील आहेत. त्यांनी आणखी काही गुंतवणूकदारांकडून पैसे जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती वाढू शकते, अशी माहती तपास अधिकारी शेळके यांनी दिली.

जादा परताव्याचा हव्यास नडला

कमी कालावधीत जादा परतावा मिळवण्याचा हव्यास गुंतवणूकदारांच्या अंगलट आला. मोठ्या बँका, पतसंस्था वार्षिक सहा ते सात टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाहीत. अशावेळी दरमहा १० ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्या प्रामाणिक असतील का? याचाही विचार गुंतवणूकदारांकडून केला जात नाही.

Web Title: Avikaj Secure defrauded investors of crores in kolhapur, case against six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.