महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी अविनाश भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 07:10 PM2019-08-14T19:10:48+5:302019-08-14T19:12:26+5:30
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.
कोल्हापूर : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक रिंगणात २५ जागांसाठी राज्यातून १६४ उमेदवार उभे होते; त्यासाठी ५९ हजार सदस्यांनी मतदान केले. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतून १७ उमेदवारांनी निवडणूक लढविली.
या उमेदवारांना राज्यभरातून वकिलांनी मतदान केले. ५ मे २०१८ पासून जिल्हानिहाय मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीला १० महिन्यांचा कालावधी लागला. बुधवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. कमिटीचा पाच वर्षांचा कार्यकाल आहे.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारी
अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे (नाशिक), उपाध्यक्ष अमोल सावंत (औरंगाबाद), बार कौन्सिल अॅड इंडिया सदस्य सतीश देशमुख (हिंगोली), वेल्फेअर सदस्य विवेक घाटगे (कोल्हापूर), सदस्य आशिष देशमुख (पुसद-यवतमाळ), गजानन चव्हाण (ठाणे), विठ्ठल देशमुख (मुंबई), परिजात पांडे (नागपूर), राजेंद्र उमाप (पुणे), जयवंत जयभावे (नाशिक), हर्षद निंबाळकर (पुणे), अविनाश आव्हाड (पुणे), संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), वसंत साळुंखे (औरंगाबाद), मोतीसिंग मोहता (अकोला), आनंदराव पाटील (लातूर), असिफ कुरेशी (नागपूर), उदय वारूंजकर(मुंबई), मिलिंद पाटील (उस्मानाबाद), मिलिंद थोबडे (सोलापूर), अनिल गोवरदिपे (नागपूर), सुभाष घाटगे (मुंबई), सुदीप पासबोला (ठाणे), वसंतराव भोसले (सातारा), अहमदखान पठाण (पुणे).
पूरग्रस्त वकिलांना मदत
कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त वकिलांना मदत मिळावी, यासाठी अॅड. विवेक घाटगे यांनी बार कौन्सिलकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्याला तत्वत: मान्यता देत सुरुवातीला साडेसात लाख रुपये मंजूर करून ते दिले.