सावधानताच घालेल अपघाताला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:39+5:302021-02-06T04:42:39+5:30

घन:शाम कुंभार : यड्राव राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु सर्वांचाच बेजबाबदारपणा अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघातामध्ये ...

Avoid accidents with caution | सावधानताच घालेल अपघाताला आळा

सावधानताच घालेल अपघाताला आळा

googlenewsNext

घन:शाम कुंभार : यड्राव राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु सर्वांचाच बेजबाबदारपणा अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघातामध्ये हकनाक जाणाऱ्या बळींना जबाबदार कोण, असा प्रश्न समोर येत असला तरी वाहतुकीमध्ये सुरक्षितता येण्यासाठी वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे होणारे काटेकोर पालन वाहतूक शाखेकडून प्रबोधनासह कडक शिस्तच रस्ते अपघाताचे प्रमाण घटवेल व हकनाक बळींना आळा बसेल. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये रेंदाळच्या भाजीविक्रेत्या दाम्पत्यासह हेल्मेटअभावी युवकांनाही प्राण गमवावे लागले. त्यामुळे परिवारापुढे निर्माण झालेल्या प्रश्नांचे जाळे कोणतेही कारण नसताना ओढावलेल्या संकटाची भयानकता दर्शविते.

प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा वाटत असल्याने वाहनाच्या वेगाकडे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आमचे काही देणे लागत नाही, या आविर्भावात असल्याने त्यांचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष, तर रस्ते वाहतूक नियंत्रण विभाग 'वाहतूक सुरक्षा अभियान' प्रारंभीचा कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरा करण्यापलीकडे जास्त लक्ष घालत नाहीत.

अपघातामध्ये गेलेल्या जिवाला नुकसान भरपाई मिळेल अथवा न मिळेल, परंतु त्यांची निर्माण झालेली पोकळी नुकसान भरपाईच्या रकमेतून भरेल का, नुकत्याच अपघातामध्ये मृत पावलेल्या स्वप्नाली कुंभार यांच्या मुलाला माया, ममता मिळेल का, तर ज्यांचा काही संबंध नाही, त्यांना अशी मोठी शिक्षा का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. घरच्या कर्त्याचा जीव गेला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. काही घटनांमध्ये मुले अपघातग्रस्त झाल्याचे पालकांना पाहावे लागते.

रस्ते वाहतूक विभागाने वाहतूक नियमांच्या कडक अंमलबजावणीकडे लक्ष देणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविणे, वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे व सावधानता बाळगणे सर्वांच्याच हिताचे आहे; अन्यथा अपघातास सर्वच घटक जबाबदार राहतील.

कोट - वाहनधारकांनी मद्यपान न करता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. वाहनधारकांना स्वत:बरोबर इतरांचीही सुरक्षितता महत्त्वाची वाटावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- नंदकुमार मोरे, सहायक पोलीस निरीक्षक इचलकरंजी

Web Title: Avoid accidents with caution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.