पाच रुपयांची नोट घेण्यास बाजारात टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:20+5:302020-12-26T04:19:20+5:30
ग्राहक-व्यापारी वाद दीपक जाधव कदमवाडी : चलनामधून एखादी नोट किंवा नाणे बाद करायचे असेल तर ते करण्याआधी रिझर्व्ह ...
ग्राहक-व्यापारी वाद
दीपक जाधव
कदमवाडी : चलनामधून एखादी नोट किंवा नाणे बाद करायचे असेल तर ते करण्याआधी रिझर्व्ह बँकेची अधिसूचना प्रसिद्ध होते; परंतु अशी कोणतीही सूचना रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध न होता व्यापारी वर्गाने पाच रुपयांची नोट व्यवहारातून कालबाह्य ठरविली आहे. ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भारतीय चलन म्हणून ५० पैसे, एक, दोन, पाच व दहा रुपयांची नाणी अधिकृत आहेत. संपूर्ण देशात याद्वारे व्यवहार केले जातात. ही नाणी बँक, एस.टी., पोस्ट ऑफिस, हॉटेल, किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेते, औषधी, रिक्षा, आदी व्यवहारांंत ग्राहकांकडून स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र काहीजण अफवा पसरवून नाणी स्वीकारणे बंद करीत आहेत. सध्या पाच रुपयांची नोट अनधिकृतपणे व्यापारी वर्गाने कोणतीही जाहीर सूचना नसताना चलनातून बंद केल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व बँकेच्या परवानगीने सध्या भारतीय चलनात एक रुपयापासून दोन हजारांपर्यंतची नोट चलनात आहे. चलनात एखादी नोट आणणे व बाद करणे हे रिझर्व बँकेच्या परवानगीशिवाय होत नाही; परंतु कोणत्याही प्रकारची अधिसूचना नसतानाही हा निर्णय परस्पर व्यावसायिक वर्गाने घेतल्याचे दिसून येत आहे.
एखादा ग्राहक पाच रुपयांची नोट घेऊन दुकानात गेला तर नोट बंद झाल्याचे सांगून दुकानदार ती नोट घेत नाहीत.
यावरून बऱ्याच वेळा ग्राहक व दुकानदार यांच्यात वाद होत आहेत.
--------------
आम्ही घेऊन काय करू?
ग्राहकांकडून आम्ही जरी पाच रुपयांची नोट घेतली तर आमच्याकडून दुसरे ग्राहक घेत नाहीत. मग आम्ही त्या नोटा आम्हाला माल पुरवणाऱ्या डिस्ट्रिब्यूटरना दिल्यावर तेही अशा नोटा नाकारतात. वाद घातल्यास ते माल घेणार असाल तर घ्या अन्यथा राहू दे म्हणून पुरवठा बंद करण्याची भीती घालत असल्याची तक्रार काही दुकानदार करीत आहेत. त्यामुळे आमच्याकडून ग्राहक घेत नाहीत, डिस्ट्रिब्यूटर घेत नाहीत; मग या नोटा आम्ही घेऊन काय करू, अशी विचारणा किरकोळ दुकानदार करीत आहेत.
-----------
तीन वर्षे कारावास
भारतीय चलन नाणी अथवा नोटा नाकारणे हे भादंवि १२४(अ) नुसार देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. तो अजामीनपात्र असून यात तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चलन नाकारू नये. अन्यथा या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
---------
कोट
काही लोक व व्यापारी अशा पद्धतीने नोटा नाकारतात; पण तुम्ही समजावून सांगूनही ते घेत नसतील तर नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊ शकता. एखादे चलन जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ते स्वीकारले पाहिजे.
- अशोक पोतनीस
ग्राहक पंचायत अध्यक्ष, कोल्हापूर महानगर.