महामंडळांना ठोकले टाळे
By admin | Published: January 3, 2015 12:07 AM2015-01-03T00:07:02+5:302015-01-03T00:11:11+5:30
निधीची मागणी : ‘लोकमत’च्या मालिकेचा प्रभाव; बहुजन परिवर्तन पार्टीचा भव्य मोर्चा
कोल्हापूर : बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले व संत रोहिदास चर्मकार मागासवर्गीय महामंडळांना टाळे ठोकले़ महामंडळांना निधी न दिल्याच्या निषेधार्थ हे टाळे ठोकण्यात आले़ महामंडळांना निधी प्राप्त होत नाही तोपर्यंत कार्यालये उघडू न देण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या राज्याध्यक्षा मनीषा नाईक यांनी दिला़ ‘लोकमत’ने मागासवर्गीय महामंडळाच्या आर्थिक दुरवस्थेबाबत नोव्हेंबरमध्ये चार भागांची मालिका प्रकाशित केली होती़
टाउन हॉल येथून दुपारी दीड वाजता मोर्चाला प्रारंभ झाला़ मागासवर्गीय महामंडळांना निधी मिळालाच पाहिजे, मागासवर्गीय महामंडळांची कर्जे माफ झाली पाहिजेत, अशा घोषणा देत हा मोर्चा दाभोळकर कॉर्नर येथे आला़ या मोर्चात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी दाभोळकर कॉर्नर येथे सुमारे तासभर ठिय्या मांडला़ त्यामुळे महामार्गापासून आंबेवाडीपर्यंतची वाहतूक खोळंबली़
ही घटना समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी येऊन बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक यांना ‘रास्ता रोको’ थांबविण्यास सांगितले़ त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये हा मोर्चा विचारे माळ येथील सामाजिक न्यायसंकुलाच्या प्रवेशद्वारावर थडकला़ या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़
यावेळी मागासवर्गीय महामंडळाच्या कार्यालयास टाळे लावण्याच्या इराद्याने कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला़; पण पोलिसांनी त्यांना अडविले़ प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा फौजपाटा तैनात केला़ त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते़ कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते़ शेवटी पोलीस बंदोबस्तामध्ये संघटनेचे बाजीराव नाईक, मनीषा नाईक, नानीबाई हेगडे, आक्काताई पांढरे, आदींनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत रोहिदास, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळांना टाळे ठोकले़ या मोर्चात संघटनेचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार चौगले, कोल्हापूर शहराध्यक्ष संजय भोसले, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माया पांढरबळे, रत्नाबाई साठे,, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते़
पोलिसांची धावपळ
मोर्चाला एवढ्या मोठ्या संख्येने महिला जमतील, याचा अंदाज पोलीस प्रशासनाला अन् महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आला नाही़ दाभोळकर कॉर्नर येथे आंदोलकांनी ठिय्या मांडल्यानंतर सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली अन् पोलीस अधिकारी खडबडून जागे झाले़ दरम्यान, कार्यालयास टाळे लावल्यानंतर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता महामंडळाच्या व्यवस्थापकांचे फोन ‘डायव्हर्ट मोड’वर होते़
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील बीजभांडवल आणि अनुदान योजनेतील मंजूर लाभार्थ्यांसाठी ७३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त्याचे वाटप पुढील आठवड्यात होणार आहे.
- दीपक खुडे, विभागीय व्यवस्थापक, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ