दाखल्यावरील ‘जात’ कायद्याने घालवा
By admin | Published: March 20, 2015 12:22 AM2015-03-20T00:22:04+5:302015-03-20T00:23:17+5:30
प्रकाश आंबेडकर यांची मागणी : कोल्हापुरात जातविरोधी एल्गार परिषद
कोल्हापूर : जातिव्यवस्थेने इथल्या समाजात भिंती निर्माण केल्या. त्यामुळे जाती गाडल्या पाहिजेत. शाळेच्या दाखल्यापासून याची सुरुवात झाली पाहिजे. जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या संघटनांनी जात का आवश्यक आहे, याची चर्चा आमच्यासोबत कुठेही करावी, असे आव्हान सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाचे मुख्य निमंत्रक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाची एल्गार परिषद येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये गुरुवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले, जातींनी समाजाचा विकास खुंटविला. जात हद्दपार झाली पाहिजे. आंतरजातीय दाम्पत्यांना होणाऱ्या अपत्याची जात भारतीयच असली पाहिजे, हे ठराव आम्ही नागपूर आणि लातूर येथील परिषदेत केले आहेत. अॅड. आंबेडकर म्हणाले, जात आणि विशिष्ट धर्माचा आग्रह करून एकता कशी साधली जाऊ शकते, याबाबतची भूमिका बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि ‘आरएसएस’ या संघटनांनी मांडली पाहिजे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावे, यासाठी ८ एप्रिलला नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.आंदोलनाचे कार्यकारी निमंत्रक भारत पाटणकर म्हणाले,जातिअंताच्या लढाईसाठी मे महिन्यापर्यंत ही प्रबोधन मोहीम चालविण्यात येणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून पुरोगामी कार्यकर्त्यांना धमकीची पत्रे येत आहेत. अंक पाठविण्यात येत आहेत. गोळ्या घालून विचार संपत नाहीत; पण अशा प्रवृत्तींना चोख उत्तर देईल. परिषदेत सुरुवातीला सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांना श्रद्धांजली वाहिली. किशोर ढमाले, अतुल दिघे, धनाजी गुरव, उदय नारकर, नामदेवराव गावडे, अरविंद देशमुख, डॉ. गेल आॅम्वेट यांची भाषणे झाली. यावेळी गौतमीपुत्र कांबळे, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते.
परिषदेतील मागण्या
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन व दाम्पत्यांना संरक्षण
शाळेच्या दाखल्यावरून जात कॉलम रद्द करण्यासाठी कायदा करावा,
आंतरजातीय दाम्पत्याच्या अपत्याची जात ‘भारतीय’ अशी असावी.
जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांना खुल्या चर्चेचे आव्हान