‘रॅन्समवेअर’ला मनपाने रोखले

By admin | Published: May 17, 2017 01:08 AM2017-05-17T01:08:03+5:302017-05-17T01:08:03+5:30

फायरवॉलचा वापर : ई-मेल वापरावर मर्यादा

Avoid keeping up with the 'RanMware' | ‘रॅन्समवेअर’ला मनपाने रोखले

‘रॅन्समवेअर’ला मनपाने रोखले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : संपूर्ण जगभरात ‘वन्नाक्राय’नामक रॅन्समवेअर व्हायरसने सायबर हल्ला चढविला असताना कोल्हापुरात मात्र महानगरपालिका प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेत या व्हायरसला रोखण्यात यश मिळविले आहे. तातडीची उपाययोजना म्हणून ‘फायरवॉल’चा वापर केला असून सर्व युएसबी वापराला बंदी तसेच अत्यावश्यक ओळखीच्या फाईल वगळता अन्य सर्व फाईल यंत्रणेमध्ये घेणे बंद केले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेला एचसीएल इन्फोटेक लि. या कंपनीने संगणकीय आॅनलाईन सेवा पुरविली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या यंत्रणेचे काम सुरळीत सुरू आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ‘वन्नाक्राय’नामक रॅन्समवेअर व्हायरसने सायबर हल्ला केला असल्यामुळे त्याचा फटका आपल्या यंत्रणेलाही बसू शकतो म्हणून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना तत्काळ दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दोन दिवसांपासून तशी दक्षता घेतली आहे. ई-मेलमधून हा व्हायरस आक्रमण करत असल्याने ई-मेल वापरावरच पूर्ण नियंत्रण आणण्यात आले आहे. पूर्वी सर्व संगणकावर ई-मेल सुविधा देण्यात आली होती, ती आता अत्यावश्यक कक्षातच देण्यात आली. दक्षता म्हणून फायरवॉल लावण्यात आली असून युएसबी वापराला बंदी केली आहे. बाहेरून मेलवर येणाऱ्या अनोळखी फाईल यंत्रणेत स्वीकारणे बंद केले आहे. ज्या ओळखीच्या व अत्यावश्यक आहेत अशा अटॅचमेंट असलेल्या पीडीएफ व डॉक फाईल खात्री करूनच स्वीकारल्या जात आहेत. कामाव्यतिरिक्त सर्व वेबसाईट बंद केल्या आहेत तसेच फेसबुक, युट्यूब यासारख्या सोशल वेबसाईट वापर बंद ठेवल्या आहेत. जसे कामकाज होईल तसे दर दोन तासांनी डाटा सुरक्षित केला जात आहे. डाटा सुरक्षित असल्याची खात्रीही दर दोन तासांनी केली जात आहे. पालिका प्रशासन, एचसीएलने आॅनलाईन सुविधा देताना पूर्ण खबरदारी घेऊन मर्यादित परंतु सुरक्षित वापर केला आहे. कंपनीचे काही अभियंते चोवीस तास या कामावर नियंत्रण ठेऊन आहेत.



"संपूर्ण कामकाज संगणकीय
महापालिकेचे संपूर्ण कामकाज आता संगणकावर चालते. माजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी अशा कामकाजाला प्राधान्य देऊन त्याची अंमलबजावणी केली. पूर्वी फाईल घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागायचे. त्यामुळे फाईल रेंगाळणे आणि नंतर त्या कुठे गेल्या याचा थांगपत्ता लागत नव्हता. आता ‘ई-आॅफिस’प्रणाली स्वीकारल्यामुळे केवळ त्याद्वारेच कामकाज चालत आहे.


रॅन्समवेअर व्हायरसमुळे निर्माण झालेला धोका ओळखून यंत्रणेवर बऱ्याच मर्यादा आणल्या आहेत. जर आवश्यकता भासलीच तर आम्ही महानगरपालिकेची वेबसाईटसुद्धा बंद ठेवण्याचा विचार करत असून त्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- जय शिंदे,
प्रोजेक्ट मॅनेजर, एचसीएल

Web Title: Avoid keeping up with the 'RanMware'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.