पूरबुडीत क्षेत्राची काळजी घेऊन नुकसान टाळा
By admin | Published: July 18, 2016 01:03 AM2016-07-18T01:03:07+5:302016-07-18T01:10:00+5:30
ऊस संशोधन केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन
कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडीशी जागरूकता दाखविली तर नुकसान कमी होण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढण्यासह विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरामुळे नदीकाठचे ऊसपीक दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली जाते. गाळमिश्रित पाणी, चिखल बसल्याने शेंडे कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो. पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळे फुटतात. कोंब फुटलेला ऊस पोकळ होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी, त्याचे वजन घटते. उसाचे शेंडे पाण्याच्या वर राहिले तरीही खालील पानांवर थर बसून नुकसान होते. कांडीवरील पानाच्या टोपणामध्ये गाळाची माती बसून कांड्यांना मुळे फुटतात. तसेच कांडीवरील डोळे फुगीर होऊन कोंब फुटण्यास सुरुवात होते. ऊसक्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सच्छिद्रता व जमिनीतील जैविक पातळी कमी होते. तसेच जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये वाहून जातात. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. पीकवाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते; तसेच पुराच्या पाण्यामुळे उसाच्या मुळ्या अकार्यक्षम होऊन ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली तर नुकसान कमी करणे शक्य असल्याचे आवाहन ऊस संशोधन केंद्राचे डॉ. एस. एम. मोरे, डॉ. व्ही. एन. नाळे, डॉ. व्ही. वाय. कंकाळ व डॉ. व्ही. एम. लोंढे यांनी पत्रकातून केले आहे. (प्रतिनिधी)
या करा उपाययोजना
पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढावे.
पूरबुडीत उसाला कोंब फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी साखर कारखाने सुरू होईपर्यंत कोंब काढावेत.
किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने एकरी सहा किलो फोरेट १० जी दाणेदार खत संरक्षक उपाय म्हणून सरीमध्ये टाकावे.
उसाची कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती करावी.
ऊस जमिनीवर पडले असल्यास ते सरळ करावेत.
एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे.