यंत्रमाग वीजदर सवलतीबाबत टाळाटाळ
By admin | Published: March 22, 2015 10:36 PM2015-03-22T22:36:40+5:302015-03-23T00:41:55+5:30
प्रताप होगाडे : ऊर्जामंत्र्यांनी वीजदर सवलतीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात ढकलला
इचलकरंजी : शासनाने कृषी पंपांना पुरविण्यात येणाऱ्या विजेसाठी सवलतीचा दर राहील, असे डिसेंबरमध्ये घोषित केले होते. तसेच यंत्रमाग उद्योगालाही वीजदराची सवलत ठेवण्यात येईल, असे जाहीर करणे आवश्यक होते; पण यंत्रमाग उद्योजकांनी ऊर्जा नियामक आयोगाकडे स्वतंत्र वर्गवारीची मागणी करावी, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचित करून वीजदर सवलतीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात ढकलला आहे, अशी टीका वीज ग्राहक व औद्योगिक संघटनांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ऊर्जामंत्र्यांनी यंत्रमाग वीजदर सवलतीचा निर्णय केला नसल्याने डिसेंबर ते एप्रिल असे पाच महिने वाढलेल्या वीजदराचा भुर्दंड यंत्रमागधारकांना सोसावा लागणार आहे, असे स्पष्ट करीत होगाडे म्हणाले, भाजपचे शासन सत्तेवर येताच त्यांनी वीजदराच्या सवलतीचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, नोव्हेंबर महिन्यापासून वाढीव वीजदराची बिले सर्वच ग्राहकांना येऊ लागली. त्यावेळी राज्यभर उद्योजक व वीज ग्राहकांचे आंदोलन झाले. तेव्हा हिवाळी अधिवेशनात वीजदराचे अनुदान चालू ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, हे अनुदान एकाच महिन्याचे असल्याचे जानेवारीमध्ये स्पष्ट झाले. तेव्हापासून राज्यातील यंत्रमागधारकांसह सर्व उद्योजक आंदोलन करीत आहेत; पण सरकार मात्र याकडे गांभीर्याने पाहत नाही.
यंत्रमाग उद्योगासाठी स्वतंत्र वर्गवारी असावी, म्हणून यापूर्वीसुद्धा ऊर्जा आयोगाकडे यंत्रमागधारक संघटनांनी मागणी केली होती; पण त्यावेळी महावितरण व शासनाने पाठिंबा दिला नसल्याने आयोगाकडून यंत्रमाग उद्योजकांची ही मागणी फेटाळण्यात आली होती. हे सरकार आता यंत्रमाग उद्योजकांना स्वतंत्र वर्गवारी आयोगाकडे मागा, असे सांगत आहे, असे सांगून होगाडे यांनी ऊर्जामंत्री केवळ फार्स करीत असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)
यंत्रमागाची नवीन दरवाढ निश्चित
नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यंत्रमाग उद्योगाच्या वीजदर सवलतीसाठी १२३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गतवर्षी वीजदर सवलतीसाठी ११०० कोटी रुपये शासनाने महावितरणला दिले होते. या पार्श्वभूमीवर सध्याची केलेली तरतूद ही गतवर्षी इतकाच यंत्रमागाचा वीजदर राहील; पण महावितरणने नव्याने मागितलेली ३२ टक्के वीजदर वाढ पुन्हा यंत्रमाग उद्योगाच्या बोकांडी बसेल, असेही प्रताप होगाडे यांनी सांगितले.